नाते जोपासायला शिकवणारी त्रिसूत्री डॉ. शालिनी फणसळकर यांचे मत; ‘रिलेशन्स’च्या तीन पुस्तकांचे प्रकाशन
पुणे, ता. २५ ः ‘‘नात्यांचा केवळ अर्थ कळून उपयोग नाही, तर ती जोपासता आली पाहिजेत. नाती ही आपल्या आयुष्यात अर्थ निर्माण करतात. त्यामुळे ती निसर्गाने आणि समाजाने आपल्याला दिलेली देणगी आहे. जन्माला येताना आपण नाती घेऊन येतो. नात्यांशिवाय आपण जगू शकत नाही. त्यामुळे ‘रिलेशन्स’ची ही तीन पुस्तके नात्यांची त्रिसूत्री आहे,’’ असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती डॉ. शालिनी फणसळकर - जोशी यांनी व्यक्त केले.
‘सकाळ’ प्रकाशनाच्यावतीने डॉ. स्मिता प्रकाश जोशी लिखित ‘रिलेशन्स - नातं जोडताना,’ ‘रिलेशन्स - नातं निभावताना’ आणि ‘रिलेशन्स - नाते तुटताना व नव्याने जुळवताना’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन एरंडवणे येथील भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सभागृहात झाले. यावेळी कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्याम रुक्मे, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. उज्ज्वला बेंडाळे, लेखिका डॉ. स्मिता जोशी आदी उपस्थित होते.
डॉ. फणसळकर-जोशी म्हणाल्या, ‘‘लग्न म्हणजे केवळ सोहळा नाही तर आयुष्यभराची बांधिलकी आहे. त्यामुळे नात्यांसाठी वेळ आणि संयम असायला हवा. नवीन पिढी ही कृतीतून शिकते. त्यामुळे आपण पालक म्हणून कुटुंबात कसे वागतो, हे ठरवायला हवे.’’
रुक्मे म्हणाले, ‘‘नाती निभावताना वाद, संवाद, विसंवाद आणि संवाद ही प्रक्रिया सुरू राहिली तर कोणालाही न्यायालयात येण्याची गरज भासणार नाही. सध्या सोशल मीडियामुळे २० टक्के घटस्फोट होत आहेत, ही बाब चिंताजनक आहे. ही तीन पुस्तके म्हणजे ‘आजीबाईंचा बटवा’ असून, प्रत्येक घरात तो पुस्तकरूपाने असायला हवा.’’
डॉ. बेंडाळे म्हणाल्या, ‘‘नाती जोडताना, जपताना, वाढवताना कशी असावी, याची मार्गदर्शिका म्हणजे ही पुस्तके आहेत. आज नाती घरापुरती राहिलेली नाहीत. बाहेर देखील त्यांचा विचार होत आहे.’’
डॉ. जोशी म्हणाल्या, ‘‘नवीन पिढीच्या नात्यांची भाषा ही वेगळी असून, नाती कशी जोडावी, कशी वाढवावी आणि तुटल्यास पुन्हा कशी जोडावी, यांविषयी पुस्तकांतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.’’
सकाळ प्रकाशनाच्या कार्यकारी संपादक दीपाली चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. अश्विनी कळमकर यांनी सूत्रसंचालन केले.
पुस्तकाविषयी :
‘रिलेशन्स - नातं जोडताना’
‘रिलेशन्स - नातं निभावताना’
‘रिलेशन्स - नाते तुटताना व नव्याने जुळवताना’
लेखिका : डॉ. स्मिता जोशी
पृष्ठे : १४९ | १९२ | १३६
किंमत : २२०/- | २५०/- | १९०/-
-----
फोटो ः 15966
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.