गणेशोत्सवात ‘पीएमपी’च्या ७८८ अतिरिक्त बस
पुणे, ता. २५ ः गणेशोत्सवासाठी ‘पीएमपी’ प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त बससेवेचे नियोजन केले आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात टप्प्याटप्प्याने ७८८ अतिरिक्त बसगाड्या धावणार आहेत. ही बस सेवा रात्री उशिरापर्यंत उपलब्ध असणार आहे. त्यामुळे पुणे व उपनगरांतून गणेशोत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही. मात्र, या अतिरिक्त बस गाड्यांना विशेष दर्जा दिला असल्याने दुपारच्या सत्रानंतर या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना १० रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत.
बससेवेची टप्प्याटप्प्याने विभागणी
पहिल्या टप्प्यात, २९, ३० ऑगस्ट आणि ५ सप्टेंबर या तीन दिवसांसाठी १६८ जादा बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन ६२० अतिरिक्त बसगाड्या चालवल्या जातील. या बस ‘यात्रा स्पेशल’ म्हणून नियमित मार्गांवर धावणार आहेत.
पासधारकांसाठी महत्त्वाचे नियम
गणेशोत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सर्व पासधारक त्यांच्या पासचा वापर करू शकतील. मात्र, रात्री १२ नंतर कुठलेही पास स्वीकारले जाणार नाहीत आणि प्रवाशांना तिकीट खरेदी करावे लागेल. रात्री धावणाऱ्या या विशेष बससेवेसाठी तिकीट दरात नेहमीच्या दरापेक्षा १० रुपये जास्त आकारले जातील.
मध्यवर्ती भागातील पर्यायी मार्ग
गणेशोत्सवामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जातात. यामुळे शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड आणि टिळक रस्त्यावरील नेहमीच्या बससेवांच्या मार्गांमध्ये आवश्यकतेनुसार बदल केले जातील. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन ‘पीएमपीएमएल’ने केले आहे.
रात्रीच्या बससेवांची ठिकाणे
- स्वारगेट बसस्थानक : कात्रज, धनकवडी, भारती विद्यापीठ, नऱ्हे, आंबेगाव, मार्केटयार्ड, सांगवी आणि आळंदी
- हडपसर गाडीतळ : स्वारगेट, पुणे स्टेशन, मनपा भवन, सासवड, जेजुरी, उरुळी कांचन, मांजरी, थेऊर, फुरसुंगी, देवाची उरुळी
- महात्मा गांधी बसस्थानक : कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, साळुंके विहार
- मनपा भवन : भोसरी, चिंचवड, निगडी, देहूगाव, विश्रांतवाडी, पाषाण, बालेवाडी, हिंजवडी आणि आकुर्डी रेल्वे स्टेशन
- या व्यतिरिक्त कात्रज, धनकवडी, निगडी, भोसरी, चिंचवड, पिंपरी मेट्रो स्टेशन, काँग्रेस भवन, डेक्कन जिमखाना आणि डेंगळे पूल यांसारख्या ठिकाणांहूनही रात्री विशेष बससेवा उपलब्ध असतील.
- ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात मागणीनुसार स्वारगेट ते निगडी मार्गावरही रात्री जादा बस सोडल्या जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.