कायदा काय सांगतो? 
- ॲड. जान्हवी भोसले

कायदा काय सांगतो? - ॲड. जान्हवी भोसले

Published on

प्रश्‍न : एखाद्या सहहिस्सेदाराने वडिलोपार्जित मालमत्ता दुसऱ्या सहहिस्सेदाराला न विचारता विक्री करू नये, यासाठी काय करता येते?
उत्तर : यासाठी कायद्यामध्ये दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे जेथे मालमत्ता आहे, तेथील कामगार तलाठी यांना लेखी अर्ज देऊन सर्व सहहिस्सेदारांची नावे सातबारावर नोंद करून घेणे गरजेचे आहे. दुसरा पर्याय म्हणजे सहहिस्सेदारांपैकी कोणत्याही एका सहहिस्सेदाराने दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून अंतिम निर्णय होईपर्यंत न्यायालयाकडून तात्पुरता मनाई हुकूम घेणे गरजेचे आहे.

प्रश्‍न : माझी पत्नी आयटी सेक्टरमध्ये काम करत होती, परंतु काही महिन्यांपूर्वी तिला नोकरीवरून काढल्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली असून, औषधोपचार सुरू आहेत. तिचे आई-वडील मला धमकावत आहेत की, माझ्यावर खोट्या केसेस करून मला अडकवतील व पत्नीला मोठ्या प्रमाणात पोटगी द्यायला लावतील.
उत्तर : तुमची पत्नी आज रोजी काम करत नसेल तर तुम्ही तिला पोटगी देणे बंधनकारक आहे. परंतु, डिप्रेशन हे मानसिक आजारामध्ये येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेक न्याय निवारणामध्ये सांगितलेले आहे. तुमच्या सासरचे अशी खोटी केस करू शकत नाहीत. यासाठी तुम्ही तुमच्या पत्नीच्या औषधोपचारांचा वैद्यकीय अहवाल व नोकरी गेलेल्याचे पत्र हे दोन्ही तुमच्याकडे ठेवणे गरजेचे आहे.

प्रश्‍न : माझ्या लग्नाला १० वर्षे झालेली आहेत. सुरुवातीच्या काळात मी सासू- सासऱ्यांसोबत राहत होते. आता आम्ही स्वतंत्र राहत आहोत. परंतु सासूबाई फोनवरून, केव्हा तरी येऊन मला सतत काही ना काही ऐकवत असतात व माझ्या नवऱ्याला माझ्याविरुद्ध सांगत असतात. आम्ही एकत्र राहत नसलो तरीदेखील मी त्यांच्यावर केस करू शकते का?
उत्तर : तुम्ही कौटुंबिक हिंसाचाराची केस करू शकता. यामध्ये तुम्ही जरी आज सासू- सासऱ्यांसोबत राहत नसला तरीदेखील तुम्ही पूर्वी एकत्र राहिलेले आहात, असे सविस्तर न्यायालयाला सांगितल्यास न्यायालय दावा दाखल करून घेते. कौटुंबिक हिंसाचाराच्या दाव्यामध्ये तुम्ही लग्नानंतर कधीही काही काळापुरते जरी एकत्र राहिलेले असाल तरीदेखील कौटुंबिक हिंसाचाराचा दावा दाखल होऊ शकतो.

प्रश्‍न : मला चार वर्षांची मुलगी आहे. गेली सहा महिने मुलगी व नवरा दोघे जण राहत आहेत व मला माहेरी राहायला लावले आहे. मला मुलीला भेटू देत नाहीत. मी न्यायालयामध्ये मुलीच्या ताब्यासाठी अर्ज करू शकते का? माझे शिक्षण कमी आहे व मी काहीही कमवत नाही. माझ्या नवऱ्याला दारूचे व्यसन आहे. मला मुलीचा ताबा मिळू शकतो का?
उत्तर : लहान मुलाचा ताबा आईकडे का वडिलांकडे द्यायचा? याबाबत कोणताही नियम ठरवलेला नाही; परंतु न्यायालय दोन्ही पक्षांचे चारित्र्य, आर्थिक परिस्थिती, मुलाशी असलेले प्रेम व संबंध, मुलाचे वय याचा सारासार विचार करते. मुलांचा ताबा ठरविण्याचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ज्या पाल्याकडे मुलाचे कल्याण होणार आहे, त्या पाल्याकडे ताबा देण्यात येतो. तुम्ही जरी नोकरी करत नसाल किंवा कमवत नसाल तर न्यायालय तुम्हाला व तुमच्या मुलांना नवऱ्याकडून पोटगी देऊ शकते.

प्रश्‍न : माझ्या पतीचे एका महिलेबरोबर विवाहबाह्य संबंध आहेत. त्या महिलेने व माझ्या पतीने मला माझ्या घरात येऊन मारहाण केलेली आहे. याची आम्ही पोलिसांकडे तक्रारही केली होती. परंतु पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही. मी त्या महिलेविरुद्ध कोणता दावा दाखल करू शकते?
उत्तर : ज्या महिलेबरोबर तुमच्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत, त्या महिलेवर आपण कौटुंबिक हिंसाचाराचा किंवा कोणताही दावा करू शकत नाही. परंतु घटस्फोटाच्या दाव्यामध्ये या महिलेला नवऱ्याबरोबर सहआरोपी करता येईल. तुम्ही तुमच्या नवऱ्याविरुद्ध दावा दाखल करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com