पुण्यनगरीत गणरायाचे जल्लोषात आगमन
पुणे, ता. २७ : ढोल-ताशांचा गजर... ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने निनादणारा आसंमत... सजवलेले मिरवणूक मार्ग अन् भव्य रथ-पालख्यांमधून निघणाऱ्या मिरवणुका... अशा प्रसन्न वातावरणात गणरायाचे आगमन झाले आणि आतुरतेने वाट पाहत असलेल्या भाविकांच्या डोळ्यांत कृतार्थतेचे भाव दाटले. गणेश चतुर्थीच्या मंगलमय दिवशी आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाचे पुणेकरांनी मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले अन् गणेशोत्सवाच्या चैतन्यदायी सोहळ्याची नांदी झाली.
मानाच्या गणपती मंडळांसह सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये तसेच घरोघरी गणरायाची बुधवारी विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. बहुतांश मंडळांमध्ये आणि घरोघरी दुपारपर्यंत गणराय विराजमान झाले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिमाखदार मिरवणुकांनी पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाचा उत्साहात प्रारंभ झाला.
प्रतिष्ठापनेसाठी पहाटेपासूनच मुहूर्त असल्याने अनेकांनी पहाटे किंवा सकाळी लवकरच घरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका पाहण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. मध्यवर्ती भागातील मानाच्या गणपती मंडळांसह प्रमुख गणेश मंडळांच्या मिरवणुका पाहण्यासाठी सकाळी आठ वाजताच भाविकांची गर्दी झाली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आणि ढोल-ताशा पथकातील वादकांच्या उत्साहालाही उधाण आले होते.
मानाच्या गणपती मंडळांच्या मिरवणुका पारंपरिक मार्गावरून मार्गस्थ झाल्या. आकर्षक रांगोळ्या आणि फुलांनी हे मिरवणूक मार्ग सजले होते. प्रत्येक मंडळाच्या मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांचे वादन झाले. या वादनाने मिरवणुकीत चैतन्य आणले. काही मंडळांनी पारंपरिक पद्धतीने पालखीतून; तर काही मंडळांनी रथातून मिरवणूक काढली.
गणरायाने जोडली कुटुंबे
सण-उत्सवांची परंपरा ही खऱ्या अर्थाने समाजाला जोडण्याचे काम करत असते. याचा प्रत्यय नेहमीच येतो. यंदाही गणेशमूर्ती घेऊन जाणारे सहकुटुंब नागरिक ‘गणपती बाप्पा’ असा गजर करत होते; तेव्हा आपसूकच आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांच्याच मुखातून ‘मोरया’ असा प्रतिसादपर गजर आपसूकच केला जात होता. उत्सवाने बांधलेली ही एकात्मतेची वीण सगळीकडेच दिसून येत होती.
‘ऑपरेशन सिंदूर’ अन् मराठी भाषेचा मुद्दा
‘ऑपरेशन सिंदूर’, तसेच सध्या गाजत असलेल्या मराठी भाषेच्या मुद्द्याचे प्रतिबिंब आगमन मिरवणुकीतही पडले होते. एका मंडळाने आगमन मिरवणुकीत ‘ऑपरेशन सिंदूर’चा देखावा करत भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम केला होता. तसेच, एका मंडळाने मराठी भाषेची महती सांगणारे फलक हाती घेतले होते.
मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना
१) मानाचा पहिला गणपती ग्रामदैवत श्री कसबा गणपती सार्वजनिक मंडळ :
मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांच्या रास्ता पेठ पॉवर हाऊस येथून सकाळी ८ वाजता मंडळाच्या आगमन मिरवणुकीला प्रारंभ झाला. अपोलो सिनेमा, दारूवाला पूल, फडके हौदामार्गे उत्सव मंडपात मिरवणूक आली. मंडळाच्या पारंपरिक पालखीत गणराय विराजमान झाले होते. मिरवणुकीत संघर्ष ढोल पथक, श्रीराम ढोल पथक, अभेद्य ढोल पथक आणि प्रभात बँड सहभागी झाले होते. स्वामी सवितानंद यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी गणरायाची प्रतिष्ठापना झाली.
२) मानाचा दुसरा गणपती ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ :
मंडळाच्या आगमन मिरवणुकीला सकाळी १० वाजता नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून सुरुवात झाली. कुंटे चौक, नगरकर तालीम चौक, आप्पा बळवंत चौकामार्गे उत्सव मंडपात मिरवणूक आली. चांदीच्या पालखीतून निघालेल्या मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅंड, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, ताल पथक, विष्णूनाद शंख पथकाचा सहभाग होता. दुपारी १२ वाजून ११ मिनिटांनी वासुदेव निवास आश्रम, पुणे महायोग शक्तीपीठाचे प्रधान विश्वस्त योगश्री शरदशास्त्री जोशी यांच्या हस्ते श्रीगणेशाची प्रतिष्ठापना झाली.
३) मानाचा तिसरा गणपती श्री गुरुजी तालीम गणपती मंडळ :
स्वप्नील सरपाले व सुभाष सरपाले यांनी तयार केलेल्या फुलांच्या आकर्षक रथातून मंडळाची आगमन मिरवणूक सकाळी ११ वाजता निघाली. गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, आप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौकामार्गे पुन्हा उत्सव मंडपात आली. मिरवणुकीत जयंत नगरकर यांच्या नगारा वादनासह अश्वराज ब्रास बँड, गुरुजी प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक, राघमंत्र पथक, विघ्नहर्ता पथक यांचा सहभाग होता. दुपारी ३ वाजता श्रीगणेशाची प्रतिष्ठापना झाली.
४) मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळ :
श्री तुळशीबाग गणपतीची आगमन मिरवणूक पारंपारिक पद्धतीने पालखीतून काढण्यात आली. गणपती चौकातून ही मिरवणूक नगरकर चौक, आप्पा बळवंत चौक, बुधवार चौक, समाधान चौक, लक्ष्मी रस्त्यामार्गे पुन्हा गणपती चौक ते उत्सव मंडपात आली. मिरवणुकीत लोणकर बंधूंचे नगारा वादन आणि रुद्रांग व तालगर्जना वाद्य पथकांचे वादन झाले. गणरायाची प्रतिष्ठापना दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांच्या हस्ते झाली. मंडळाचे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे.
५) मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती मंडळ :
केसरीवाडा गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकीला रमणबाग चौकातून प्रारंभ झाला. परंपरेनुसार मानाच्या पालखीत गणराय विराजमान झाले होते. टिळकवाड्यात मिरवणूक आल्यानंतर श्रीराम आणि शिवमुद्रा या ढोल-ताशा पथकांचे स्थिर वादन झाले. तसेच बिडवे बंधू यांचे सनई-चौघडा वादनही झाले. सकाळी १० वाजता रौनक टिळक यांच्या हस्ते श्रीगणेशाची प्रतिष्ठापना झाली.
६) दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट :
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या रथातून दिमाखदार आगमन मिरवणूक काढण्यात आली. रथावर भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती लावण्यात आली होती. मुख्य मंदिरापासून आप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक आली. देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग होता. सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी श्री झालरिया पीठाधीश्वर स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते श्रीगणेशाची प्रतिष्ठापना झाली.
७) अखिल मंडई गणपती मंडळ :
फुलांनी सजलेल्या भव्य मयूर रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक निघाली. महात्मा फुले मंडई पोलिस चौकी, बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक ते उत्सव मंडप असा मिरवणुकीचा मार्ग होता. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बँड पथक होते. मल्हार ढोल-ताशा पथक, स्वराज्य पथक आणि समर्थ पथकाने ढोल-ताशा वादन केले. श्रीगणेशाची प्रतिष्ठापना दुपारी १२ वाजता ‘युनिटी एनर्जी प्रा. लि.’चे अध्यक्ष नवीनचंद्र मेनकर व स्नेहल मेनकर यांच्या हस्ते झाली. यंदा हलत्या झोपाळ्यावर शारदा गजानन विराजमान झाले आहेत.
८) श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट :
मंडळाची मिरवणूक उत्सव मंडपापासून छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बुधवार चौक, तांबडी जोगेश्वरी मंदिर, आप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्ता, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मार्गावरून पुन्हा उत्सव मंडपापर्यंत आली. मंडळाच्या पारंपरिक रथातून ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत श्रीराम पथक, केशव शंखनाद पथक, स्वयंभू पथक, वाद्यवृंद, गजर प्रतिष्ठान, नूमवि वाद्यपथक, कलावंत पथक, विश्वगर्जना ट्रस्ट आदी पथके सहभागी झाली होती. आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते दुपारी दीड वाजता श्रीगणेशाची प्रतिष्ठापना झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.