कात्रजमध्ये परप्रांतीयाकडून अफू जप्त
पुणे, ता. २८ : अफूची बोंडे बाळगणाऱ्या परप्रांतीय तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पाच किलो अफूची बोंडे, तसेच टरफले जप्त केली असून यातील बोडांची किंमत ९५ हजार रुपये आहे.
मांगीलाल पूनाराम रहाड (वय २९, सध्या रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, मूळ रा. जालोर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. भारती विद्यापीठ ठाण्याचे तपास पथक २६ ऑगस्टला रात्री कात्रज परिसरातील लेकटाऊन सोसायटी परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी रहाड एका सोसायटीच्या सीमाभिंतीजवळ थांबला होता. त्याच्याकडे पोते होते. पोलिसांच्या पथकाने संशयावरून त्याची चौकशी केली. त्याच्याकडील पोत्याची तपासणी केली, तेव्हा अफूची बोंडे आणि टरफले सापडली. रहाड याने अफूची बोंडे कशासाठी बाळगली होती, तसेच तो कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. अमली पदार्थ विरोधी प्रतिबंधक कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक निरीक्षक स्वप्नील पाटील, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, पोलिस कर्मचारी मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.