बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलला सुरुवात
पुणे, ता. २८ : ‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा’ हे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी ‘संवाद, पुणे’, वृद्धी रिॲलिटी आणि अस्तित्व फाउंडेशनतर्फे आयोजित बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलला गुरुवारी सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे, चित्रांचे तसेच छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ बालसाहित्यकार ल. म. कडू यांच्या हस्ते झाले. ‘अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता वाढीस लागण्यास मदत होईल’, असे मत कडू यांनी व्यक्त केले. याप्रसंगी ‘संवाद, पुणे’चे अध्यक्ष सुनील महाजन, वृद्धी रिॲलिटीच्या प्रतिनिधी धनश्री फाटक, अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री जायभाये, सातारकर स्टुडिओच्या प्रज्ञा सातारकर, सिने मॉडेल आर्ट स्टुडिओचे सुरेश राऊत आदी उपस्थित होते.
कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण कलादालनात हे प्रदर्शन भरविण्यात आले असून, ते रविवारपर्यंत (ता. ३१) सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. श्रीनिवास पतके यांच्याही छायाचित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे.