देखाव्यांतून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे दर्शन

देखाव्यांतून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे दर्शन

Published on

पुणे, ता. १ : महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा कणा असलेली, मात्र काळाच्या ओघात विस्मरणाच्या उंबरठ्यावर दडून बसलेली महाराष्ट्राची लोकपरंपरा ही विविध अंगांनी नटलेली आहे. याचाच प्रत्यय आला यंदाच्या गणेशोत्सवातून. या वर्षी गणेश मंडळांनी सादर केलेल्या देखाव्यांतून पहाटेच्या रम्य प्रहरी क्षितिजावर केशरी रंगाची उधळण होताना वासुदेवाने घातलेली साद, जागरणात वाघ्यामुरळीने केलेले नृत्य, ठसकेबाज लावणीचा हुंकार आदी विविध लोककलेचे स्मरण घडले.
गणेश मंडळांनी सादर केलेल्या देखाव्यांतून लोककलेचा जागर झाला. तर काही मंडळांनी पौराणिक कथेच्या माध्यमातून चिमुकल्यांच्या भावविश्‍वाला साद घातली, काही मंडळांनी बेभान झालेल्या तरुणाईला वास्तिवकेचा आरसा दाखविला. यामुळे देखाव्यांतून मनोरंजनासोबतच लोककलेचा उत्सव अनुभवाला आला. तसेच सामाजिक विषयावर भाष्य करताना सामाजिक वीण घट्ट करण्याचाही प्रयत्न मंडळांनी केल्याचे दिसून आले. बहुतांश मंडळांनी जिवंत देखाव्यांवर भर दिला असून दत्तवाडी, स्वारगेट, नवी पेठ, सारसबाग, टिळक रस्ता आदी भागांतील देखाव्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
नवी पेठ, गांजवे चौक येथील उत्सव मित्रमंडळाने ‘ध्येय प्रगतीचे, उच्च शिक्षण पुण्याचे’ या विषयातून पुण्याच्या सद्यस्थतीतील परिस्थितीचा व तरुणाईच्या मानसिकतेचा ऊहापोह केला आहे. यात शिक्षणाच्या निम्मिताने आलेल्या तरुणी, पुढे वाईट संगतीत वाहत जाते. यामुळे शैक्षणिक तिचे नुकसान होते आणि यातून तिला पश्‍चात्ताप होत असल्याचे दृश्‍य देख्याव्यातून दाखविले आहे.
टिळक रस्त्यावरील शेंडगे आळीच्या टिळक रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. यात १३ कलाकारांनी २५ मिनिटांच्या सादरीकरणात महाराष्ट्राच्या गौरवशाली लोकपरंपरेचे दर्शन घडवीत गणेश वंदना, वासुदेव, वाघ्यामुरळी, पोतराज, लावणी, जागरण गोंधळ आदी लोककला सादर केल्या. तसेच यामध्ये प्रगत मानसिकतेच्या तरुणीला महाराष्ट्राची लोककलेची महती देताना हळुवारपणे लोककलेची झालेली गुंफण पाहताना प्रेक्षक भारावून जात आहेत.
नवी पेठ येथील शिवांजली मित्रमंडळाने श्री नृसिंह अवतारचा पौराणिक हलता देखावा सादर केला असून तो पाहण्यासाठी चिमुकल्यांसह मोठ्यांची देखील गर्दी होत आहे.
टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठ सेवक गणेशोत्सव मंडळाने शनिवारवाड्याची प्रतिकृती सादर केली असून ती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. तसेच येथील हिराबाग मित्रमंडळाने यंदा ‘प्रकाशमय विनायक’ या संकल्पनेवर आधारित आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. जर्मन येथील ‘मॅड्रिक्स तंत्रज्ञानावर’ आधारित एलइडी बल्ब बसविले आहेत. गाण्याप्रमाणे या बल्बवरील चित्रे सतत बदलत जात असून नागरिक या रोषणाईचा आनंद घेताना दिसतात.
सदाशिव पेठेतील खजिना विहीर तरुण मंडळाने हलत्या देखाव्यातून ‘वाल्याचा वाल्मीकी’ होण्याचा प्रवास उलगडला आहे. नारद ऋषीचे संभाषण आणि वाल्याचे झालेले मत परिवर्तन हे या १० मिनिटांच्या देखाव्यातून दाखविले आहे. यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘गोकुळधाम’ साकारले आहे. यातून कृष्णाची विविध रूपे दाखविली आहेत.

जिवंत घोड्याची प्रेक्षकांना भूरळ
लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील संयुक्त जवान मंडळ ट्रस्टने २२ मिनिटांचा ‘खंडोबा माहात्म्य’चा जिवंत देखावा सादर केला आहे. यात २८ कलाकारांनी खंडोबाच्या जीवनावर आधारित काही महत्त्वाचे प्रसंग दाखविले आहे. जिवंत घोड्यावर आलेले खंडोबा हे प्रेक्षकांना भारावून टाकत असून या देखाव्यातून खंडोबाचे माहात्म्य सांगण्यात आले आहे.

चिमुकल्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू
नवी पेठ परिसरातील अष्टविनायक गणेश मंडळाने ‘गोष्टीतील बप्पा’ या संकल्पनेवर आधारित देखावा सादर केला. मंडळाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने त्यांनी देखाव्यातून २५ गोष्टी सांगितल्या आहेत. यात लाकूडतोड्यापासून ते ससा कासवाची गोष्टही दाखविली
आहे. लहान मुलांसाठी हा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com