मीरा ताऱ्यांकडून वैश्विक विस्ताराचा स्वतंत्र दर
‘आयुका’चे प्रा. अनुपम भारद्वाज यांच्या नेतृत्वाखालील संशोधन

मीरा ताऱ्यांकडून वैश्विक विस्ताराचा स्वतंत्र दर ‘आयुका’चे प्रा. अनुपम भारद्वाज यांच्या नेतृत्वाखालील संशोधन

Published on

पुणे, ता. १ : आपला तेजस्वीपणा ठराविक पद्धतीने वेळोवेळी बदलणारा अशी ‘मीरा’ या ताऱ्यांची विशेष ओळख. मीरा या चलताऱ्यांचे प्रकाशमान परिपूर्णपणे नोंदविण्याच्या अचूकतेची नवीन पातळी नुकतीच संशोधकांना गाठता आली आहे. या संशोधनामुळे विश्वाच्या विस्ताराचा दर, हबल स्थिरांकाचे आतापर्यंतचे सर्वात अचूक मापन करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.
आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीशास्त्र केंद्रातील (आयुका) प्राध्यापक अनुपम भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनात विश्वाच्या विस्ताराचा दर, स्थिरांकाचे आतापर्यंतचे सर्वात अचूक मापन करण्यात आले. ‘ॲस्ट्रोफिजिकल’ या नामांकित जर्नलमध्ये यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. आपल्या आकाशगंगेतील १८ तारकांच्या समूहात असलेल्या ४० प्राणवायू समृद्ध मीरा या चल ताऱ्यांचा वापर करण्यात आला आहे.
प्रा. भारद्वाज यांनी संशोधनादरम्यान ‘मीरा’ ताऱ्यांचे दीर्घकाळ निरीक्षण केले आहे. या ताऱ्यांची सरासरी चमक आणि स्पंदन कालावधी संशोधनात नमूद केला आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या गैया मिशनने पृथ्वीपासून १३ हजार ते ५५ हजार प्रकाशवर्षादरम्यान असलेल्या या ताऱ्यांच्या समूहाला अचूक भौमितिक अंतर प्रदान करून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मीरा या चलताऱ्यांचे प्रकाशमान परिपूर्णपणे नोंदविण्याच्या अचूकतेची नवीन पातळी संशोधकांना गाठता आली.
प्रा. भारद्वाज म्हणाले,‘‘या थंड ताऱ्यांवर आधारित सर्वात अचूक वैश्विक विस्तार दर निश्चित करण्यासाठी आम्ही आपल्या आकाशगंगेतील विविध मिरासचा प्रथमच वापर केला. स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूट आणि जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे नोबेल पारितोषिक विजेते अॅडम रिस हे या कामाचे सह-लेखक आहेत.’’
युरोपियन सदर्न वेधशाळेतील कर्मचारी, सह-लेखिका आणि खगोलशास्त्रज्ञ डॉ. मरीना रेजकुबा यांनी या अभ्यासाचे महत्त्व मांडले आहे. त्या म्हणाल्या,‘‘हे कार्य तारकीय खगोलभौतिकशास्त्र आणि विश्वविज्ञानाला जोडते आणि त्याचा प्रभाव पुढील अनेक वर्षे जाणवेल. हबल स्थिरांकासाठी चांगल्या-कॅलिब्रेटेड अँकर म्हणून मीरा व्हेरिएबल्सचा वापर विश्वाबद्दलची आपली समज सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.’’
.......

*‘मीरा’ ताऱ्यांविषयी काही...*
ठराविक पद्धतीने वेळोवेळी आपली तेजस्वीपणा लक्षणीयरित्या बदलणारा अशी ‘मीरा’ या ताऱ्यांची विशेष ओळख. त्याला ‘ओमिक्रॉन सेटी’ देखील म्हणतात. खगोलशास्त्रज्ञांनी १७ व्या शतकात शोध लावलेला हा पहिला असा तारा होता. हा असा तारा आहे, की जो सतत एकसारख्या तेजस्वितेने चमकत नाही. या ‘व्हेरिएबल स्टार’ प्रकारातील ताऱ्याचे हे पहिले उदाहरण. ‘मीरा’ हे नाव लॅटिन शब्दातून घेतले असून, त्याचा अर्थ अद्‌भूत असा आहे. मीरा हा तारा व्हेरिएबल्स तारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताऱ्यांच्या संपूर्ण वर्गाचा एक नमुना आहे.
.........
फोटोः 45672, 45674

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com