यकृताचे आरोग्य जपण्याची गरज
पुणे, ता. ७ : कावीळसारखा विषाणूजन्य संसर्ग, दीर्घकाळाचे मद्यपान, चुकीचा आहार, स्थूलता व बदललेल्या जीवनशैलीमुळे यकृत निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. यकृत (लिव्हर) निकामी झाल्यावर त्याचे प्रत्यारोपण करणे हा पर्याय उरतो. पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या आकडेवारीनुसार, पुणे विभागात ८०० जण यकृताच्या प्रतीक्षेत आहेत. यकृत निकामी होऊ नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ व्यक्त करतात.
गेल्या महिन्यात सह्याद्री रुग्णालयात पतीला यकृत दान करणाऱ्या पत्नीचा व पतीचा मृत्यू झाला. त्यावरून यकृताचे वाढते आजार व प्रत्यारोपणाबाबत चर्चा सुरू झाली आहे. यकृत हा शरीराचा महत्त्वाचा अवयव असल्याने त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्नातील चरबी पचविण्यासाठी पित्तरस तयार करणे, ग्लायकोजनच्या स्वरूपात साखर साठवून ऊर्जा नियंत्रित करणे, शरीरात आलेली औषधे, मद्य व विषारी रसायने दूर करून रक्त शुद्ध करणे, महत्त्वाची प्रथिने तयार करणे, चरबी, साखर व प्रथिनांचे रूपांतर करून ऊर्जा संतुलन राखण्याचे कार्य यकृत करत असते. यकृताचे आजार, यकृताच्या आजारांबाबतचा गैरसमज व होणारे दुर्लक्ष यामुळे यकृत निकामी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत यकृत प्रत्यारोपण हा पर्याय आहे. मात्र तो प्रचंड खर्चिक व काळजीपूर्वक करावा लागणारा प्रकार आहे.
यकृत दान करण्याच्या पद्धती
१) जिवंत व्यक्तीकडून आणि ब्रेन डेड रुग्णाकडून यकृत दान करता येते. जिवंत दात्याचे अर्धे यकृत घेऊन प्रत्यारोपण केले जाते. त्यानंतर ते दोघांच्या शरीरात पुन्हा वाढते. मात्र, दाता हा पूर्णपणे निरोगी आणि सुदृढ असावा. त्याचे यकृत व्यवस्थित कार्यरत असणे महत्त्वाचे आहे. त्याला हृदयविकार, मधुमेह, यकृताचे आजार किंवा संसर्गजन्य रोग नसावा. रुग्णाचा आणि दात्याचा रक्तगट जुळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याशिवाय प्रत्यारोपण करणे सुरक्षित नसते.
२) दुसऱ्या पद्धतीत ब्रेन डेड रुग्णाचे संपूर्ण यकृत प्रत्यारोपणासाठी वापरता येते. यकृताचे दान केवळ जवळच्या नात्यातील व्यक्तींकडून केले जाऊ शकते. दात्याला संसर्गजन्य आजार असल्यास किंवा रुग्ण व दाता यांचे रक्तगट जुळत नसल्यास प्रत्यारोपण अशक्य होते.
जवळच्या नात्यातील जिवंत व्यक्तीकडून यकृताचा ४० ते ७० टक्के भाग दान केला जाऊ शकतो. दाता सामान्यतः रुग्णाचा आई, वडील, भाऊ, बहीण, पती/पत्नी किंवा जवळचा नातेवाईक असतो. त्याचे वय १८ ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावे. दात्याने शस्त्रक्रियेची जोखीम आणि दानानंतरचे जीवनशैली बदल समजून घेतलेले असणे आवश्यक आहे. दानानंतर दात्याचे यकृत काही आठवड्यांत पुन्हा पूर्णपणे कार्यक्षम होते. आपल्या यकृत दानाच्या निर्णयातून आपण एका व्यक्तीचे जीवन वाचवतो आणि संपूर्ण कुटुंबासाठी आनंद निर्माण करू शकतो.
- डॉ. बिपिन विभुते,
यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.