सामाजिक प्रश्‍न, ज्वलंत विषयांवर देखावे सादर

सामाजिक प्रश्‍न, ज्वलंत विषयांवर देखावे सादर

Published on

पुणे, ता. २ : गणेश पेठ, रविवार पेठ, घोरपडे पेठेसह छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज रस्ता परिसरातील गणेश मंडळांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पौराणिक, ऐतिहासिक देखावे सादर करण्यावर भर दिला आहे. याबरोबरच ऑपरेशन सिंदूर, गणेशोत्सवावरील निर्बंध, शेतकरी आत्महत्येपासून महिलांच्या मासिक पाळीसारख्या संवेदनशील विषयांवरही जिवंत देखावे सादर केले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
गणेश पेठेतील नवजीवन मित्र मंडळाने ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित देखावा तयार केला आहे. ‘शिवरायांचा गनिमी कावा ते भारतीय सैन्याची शौर्यगाथा’ या संकल्पनेवर हा देखावा आधारित आहे.
रविवार पेठेतील आदर्श मित्र मंडळाचाही ‘ऑपरेशन सिंदूर’ हा १६ मिनिटांचा हा देखावा भाविकांना खिळवून ठेवण्याचे काम करतो. युद्धजन्य स्थिती व विमानांच्या प्रतिकृती लहान मुलांचे लक्ष वेधून घेण्याचे काम करते. या मंडळाचे यंदा ९९ वे वर्ष आहे. पुणे बढाई समाज ट्रस्ट, समस्त रविवार पेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तंबाखू आळी मित्र मंडळ, श्री गणेश सेवा मित्र मंडळ, कापडगंज सार्वजनिक मंडळ, श्री शिवराज मित्र मंडळ या मंडळांनी यंदा साधेपणावर भर दिला आहे.
रविवार पेठेतील श्री शिवांजली मित्रमंडळाने यंदा आकर्षक पद्धतीने ‘शिवमहल’ साकारला आहे. भव्य स्वरूपातील हा देखावा पाहण्यासाठी भाविक गर्दी कतर आहेत. कस्तुरे चौक तरुण मंडळाने यंदा ‘मूषक गजानन रथ’ हा देखावा सादर केला आहे. मूषकाच्या रथावर विराजमान झालेली श्रींची भव्य मूर्ती पाहण्यास भाविकांसह लहान मुलांकडून पसंती मिळत आहे. सामाजिक व ज्वलंत विषयांवर देखावे सादर करण्याची परंपरा असलेल्या श्री सुंदर गणपती मंडळाने यंदा ‘स्वतंत्र भारतातील बंदिस्त गणेशोत्सव’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. गणेशोत्सवात मंडळांवर प्रशासनाकडून लादण्यात येणाऱ्या विविध अटी, शर्ती व निर्बंध यावर या देखाव्याद्वारे प्रकाश टाकला आहे. ‘गणेश मंडळांना प्रशासनाकडून होणारे असहकार्य’ या विषयाकडेही देखाव्यातून लक्ष वेधण्यात आले असून १३ मिनिटांचा हा देखावा ५ कलाकारांनी सादर केला आहे. या मंडळाचे यंदा १३० वे वर्ष आहे.
गुरुवार पेठ व छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील मंडळांनी पौराणिक देखाव्यांसह जिवंत देखाव्यांद्वारे सामाजिक प्रश्‍नांवर, भारत-पाकिस्तान युद्धावर प्रकाश टाकला आहे. धर्मवीर तरुण मंडळाने ‘श्रेष्ठ कोण- शनिदेव की माता लक्ष्मी’ हा पौराणिक हलता देखावा सादर केला आहे. मंडळाचे यंदा ९० वे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील राजर्षी शाहू चौक मंडळाने यावेळी ‘दशावतार - विष्णूचे दहा अवतार’ हा पौराणिक व वैविध्यपूर्ण देखावा सादर केला आहे. मंडळाचे यंदा १०३ वे वर्ष आहे.
श्री लाकडी गणपती मंडळाकडून यंदा रायगडासह राज्यातील काही किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित झाल्यानिमित्त भव्यदिव्य स्वरूपात रायगड किल्ला साकारण्यात आला आहे. श्री शिवाजी चौक मित्रमंडळाने ‘प्रणाम तुजला-मृत्युंजयविरा’ हा देखावा साकारला आहे. भारतीय सैन्याचे साहस व शेतकऱ्यांचे प्रश्‍न देखाव्याद्वारे मांडले आहेत. वनराज मंडळ, श्रीनाथ गणेश मंडळ, आनंद मित्रमंडळाने साधेपणावर भर दिला आहे.
वीर शिवराज मंडळाने मासिक पाळीवर आधारित ‘मोनोपॉज - गेले ते चार दिवस’ या विषयावरील देखावा सादर केला आहे. महिलांना येणाऱ्या अडचणी, त्यांना होणाऱ्या वेदना व या प्रश्‍नाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, यावर देखाव्याद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. खडक पोलिस वसाहत मंडळाकडून कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराचा देखावा सादर करण्यात आला आहे. हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या बाल साईनाथ मंडळ ट्रस्टने भगवान विष्णूच्या अवतारातील श्री गणरायाची २२ फूट उंच मूर्ती साकारली आहे.

घोरपडे पेठेतील जय हनुमान मित्रमंडळाने ‘कृष्णामाई मंदिर - महाबळेश्‍वर’ साकारले आहे. श्रीमंत सुवर्णभारत मित्रमंडळाने ‘रामसेतू’चा देखावा साकारला आहे. नेहरू तरुण मंडळाने सादर केलेला ‘भुतबंगला’ हा देखावा परिसरात चर्चेचा विषय ठरला असून तो पाहण्यासाठी लहान मुलांसह कुटुंबातील सदस्यांची चांगलीच गर्दी होत आहे. गुरुवार पेठेतील हिंद युवक तरुण मंडळाने ‘शंकर महल’
साकारला आहे. उत्सवाच्या काळात मंडळाकडून लहान मुलांसाठी खेळ, जागरण गोंधळ, बालमेळावा, अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात असून मंडळाकडून विसर्जन मिरवणूक काढली जात नाही. शार्दूल मित्र मंडळाने ‘प्रभू श्रीरामाची विजयी मिरवणूक’ हा देखावा सादर केला आहे. तर शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या श्री शितळादेवी मंडळातर्फे ‘स्वप्नपूर्ती मारुती देवालय’ हा देखावा साकारण्यात आला आहे. झुंजार मित्रमंडळाकडून साधेपणावर भर देण्यात आला आहे. मंडळाकडून वर्षभर विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. श्री शिव छत्रपती मंडळाने ‘आई कुठे काय करते’ या देखाव्याद्वारे आईच्या कामाचे महत्त्व पटवून दिले आहे. गणेशोत्सवात मंडळाकडून गरजू विद्यार्थ्यांना २०० सायकल वाटप करण्यात आल्या असून स्वच्छता कर्मचारी महिलांचा सन्मान करण्यात आला आहे.

घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक
गणेशोत्सव मंडळांचे प्रश्‍न समजून घेण्यासाठी ते सोडविण्यासाठी महापालिका, पोलिस, महावितरण प्रशासन कमी पडते. प्रशासनाकडून मंडळांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात आला. तर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून मंडळांच्या परिसरातील स्वच्छतेला चांगलेच प्राधान्य दिले जात आहे. स्वच्छता कर्मचारी नियमितपणे स्वच्छता करत असल्याचे राजपाल ठाकूर यांनी आवर्जून नमूद केले.

आवर्जून पाहावेत असे देखावे
- नेहरू तरुण मंडळ : भूतबंगला
- वीर शिवराज मंडळ : मोनोपॉज गेले ते चार दिवस
- श्री शिवाजी चौक मित्रमंडळ : प्रणाम तुजला-मृत्युंजयविरा
- राजर्षी शाहू चौक मंडळ :- दशावतार - विष्णूचे दहा अवतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com