वैविध्यपूर्ण देखाव्यांची भाविकांना अविस्मरणीय अनुभूती

वैविध्यपूर्ण देखाव्यांची भाविकांना अविस्मरणीय अनुभूती

Published on

पुणे, ता. ३ : पाकिस्तानच्या दहशत वादाला चोख प्रतिउत्तर देणारे ‘ऑपरेशन सिंदूर’, अफजल खानाचा वध, बाजीप्रभू यांचे अतुलनीय शौर्य, हनुमंताची परम्‌भक्ती असा एकीकडे, तर दुसरीकडे मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा अशा वैविध्यपूर्ण देखावे नागरिकांचे आकर्षण ठरत आहेत.
लष्कर भागासह सोमवार पेठ, भवानी पेठ आणि महात्मा फुले पेठ (गंज पेठ) भागांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही देखाव्यांमध्ये वैविध्य जपले आहे. सामाजिक संदेशासोबतच पौराणिक देखाव्यांवर भर देत देशाच्या लष्कराने मान उचांवेल असे काम केलेला देखावा सादर करण्यावर भर दिला आहे. बहुतांश मंडळांनी जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा वसा कायम ठेवला आहे. गणेशोत्सवच नव्हे, तर वर्षभर सामाजिक उपक्रम राबविण्यात आघाडीवर असलेले पेठांमधील मंडळे परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करीत आहेत.

राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लष्कर भागातील केदारी रस्त्यावरील भोपळे चौकातील श्रीमंत साईनाथ तरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट आणि हिंदू तरुण मंडळाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अप्रतिम जिवंत देखावा सादर केला. सोळा कलाकारांच्या माध्यमातून साकारलेल्या या देखाव्यामध्ये लष्कराची ताकद असलेल्या लढाऊ विमानांनी युद्धभूमीवर केलेला बॉम्ब वर्षाव देखावा पाहताना भाविकांना प्रत्यक्ष अनुभव घडवितो. परिसरातील ताबूत स्ट्रीटवरील सरबतवाला चौकातील श्रीकृष्ण तरुण मंडळाने पावनखिंडीतील बाजीप्रभू यांच्या अतुलनीय शौर्य यावर आधारित जिवंत देखावा सादर केला. तो नागरिकांच्या आकर्षणाचा ठरत आहे. तर क्वार्टर चौकातील श्री शिवराज मंडळ ट्रस्टने ‘अफजलखानाचा वध’ हा देखावा सादर केला आहे. मंडळाचे आधारस्तंभ अजय भोसले आणि अध्यक्ष अरविंद पाबळे यांच्या संकल्पनेतून हा देखावा सादर केला आहे.

सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक देखाव्यांवर यंदा सोमवार पेठेतील मंडळांनी भर दिला आहे. गोसावीपूरा सार्वजनिक गणेश मंडळाने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची दक्षिण दिग्विजय मोहीम याचा जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून छत्रपतींच्या पराक्रम मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पेठेतील लडकत पेट्रोल पंपाजवळील अपोलो तरुण मंडळाने ‘माझ्या मराठीचे बोलू कौतुक’ या देखाव्यांच्या माध्यमातून मराठी भाषेचा गौरव यावर आधारित जिवंत देखावा सादर केला. वीरचक्र तरुण मंडळ ट्रस्टने ‘अघोरी भस्म आरती’ हा हलता देखावा सादर करून देखाव्यांमधील विविधतेची परंपरा कायम ठेवली आहे. कमला नेहरू हॉस्पिटल चौकातील विजय मंडळ ट्रस्टने ‘श्री दत्त निर्गुण मठ’ हा देखावा साकारला आहे.


भवानी पेठेत वैविध्यपूर्ण देखावे
भवानी पेठेतील पालखी विठोबा चौकातील जय महाराष्ट्र तरुण मंडळाने ‘अहिरावण व महिरावणाचा’ वध हा हलता देखावा सादर केला आहे. तर गूळ आळीतील मारुती मंदिर मंडळ ट्रस्टने ‘जय मल्हार’ या देखाव्यांच्या माध्यमातून भगवान शंकराच्या भक्तीच्या प्रचितीचा अनुभव मांडण्याचा केलेला प्रयत्न नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहे. तर महात्मा फुले पेठेतील मंगल क्लब मित्र मंडळ आणि आपला मारुती मित्र मंडळाने ‘संकटमोचन हनुमान’ यावर आधारित हलता देखावा सादर केला आहे. वैविध्यपूर्ण देखावे सादर करण्यात अग्रेसर असलेल्या भवानी पेठेतील भवानी माता मंदिर चौकातील आदर्श बाल मंडळाने यंदा ‘भगवान श्री नृसिंह अवतार’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होणे आणि डिजे मुक्त म्हणून हे मंडळ ओळखले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com