कायदा काय सांगतो ? - ॲड. जान्हवी भोसले
प्रश्न : माझा विवाह २०१९ मध्ये झाला. दोन महिन्यानंतर माझी पत्नी स्वतःशीच बोलत असे, टाळ्या वाजवत व विचित्र वागत. तिला विचारले असता तिने स्वतः मनोरुग्ण असण्याची कबुली दिली, लग्नाच्या आधीपासून मनोरुग्णतज्ज्ञांकडे तिचे उपचार सुरू होते. लग्नानंतर सहा महिन्यांनी ती माहेरी गेली, ती आजपर्यंत आली नाही. आम्ही काय करू शकतो?
उत्तर : आपण यामध्ये घटस्फोटासाठी दावा दाखल करू शकता, ज्यामध्ये आपल्या पत्नीचे मनोरुग्ण असल्याचे अहवाल पुराव्याकामी दाखल करू शकता, तसेच लग्नाआधी असलेले आजार लपवून ठेवले यासाठी फसवणुकीचा फौजदारी दावादेखील करू शकता.
प्रश्न : माझ्या लग्नाला सहा महिने झालेले आहेत; परंतु माझे पती शरीरसंबंधांसाठी सतत नकार देतात. आमच्यामध्ये आजपर्यंत एकदाही संबंध आलेले नाहीत, मी काय करावे?
उत्तर : यासाठी तुम्हाला काही वैद्यकीय अहवाल काढून घेणे गरजेचे आहे, ज्यामध्ये पतीमध्ये दोष आहे की नाही? हे सिद्ध होईल, किंवा तुमचे पती मुद्दाम संबंधांना नकार देत आहेत, हे लक्षात येईल. जर पती किंवा पत्नीमध्ये संबंध प्रस्थापित होण्यासाठी वैद्यकीय बाधा असेल व लग्नानंतर संबंधच आले नसल्यास घटस्फोटासाठी दावा दाखल न करता विवाह रद्द करण्यासाठी दावा दाखल करू शकता आणि पतीकडून नुकसान भरपाई मागू शकता.
प्रश्न : वाटपाच्या दाव्याचा न्याय निर्णय झाला, तरीदेखील प्रत्यक्ष वाटप झाले नाही. यासाठी काय करावे?
उत्तर : वडिलोपार्जित मिळकतीमध्ये दावा दाखल झाल्यानंतर न्यायालय योग्य तो न्यायनिवाडा करून निर्णय देते; परंतु वाटपाच्या दाव्याच्या निर्णयाप्रमाणे वाटप मिळण्यासाठी न्यायालयात आपणास ‘दरखास्त दावा’ दाखल करावा लागतो. त्या दाव्यामध्ये न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अशी न्यायालयाकडे विनंती केलेली असते. त्याप्रमाणे न्यायालयातर्फे जिल्हाधिकारी व त्यांच्याकडून तहसीलदारांकडे भूमी अभिलेख पाठवले जातात व त्याप्रमाणे वाटप करून दिले जाते.
प्रश्न : ९९ वर्षांच्या कराराने मालकी प्राप्त होते का?
उत्तर : अजिबात नाही. ९९ वर्षांच्या कराराने आपण मालक होऊ शकत नाही. मालक होण्यासाठी तुम्हाला खरेदीखत करणे व ते खरेदीखत नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. ९९ वर्षांच्या कराराने तुम्ही न्यायालयामध्ये बचाव घेऊ शकता. परंतु तुमची मालकी दाखवू शकत नाही.
प्रश्न : आम्ही सहा महिन्यांसाठी परदेशात जाणारा आहोत, परंतु आमचा जमिनी संदर्भातला दावा पुणे न्यायालयात सुरू आहे. त्यात आम्ही अनुपस्थित राहिलो तर काय होईल व यासाठी पर्याय काय आहे?
उत्तर : आपण न्यायालयाची परवानगी घेऊन परदेशात जाऊ शकता; परंतु सर्वात योग्य पर्याय म्हणजे आपण आपल्या विश्वासातल्या व्यक्तीकडे कुलमुखत्यार पत्र देऊन, तुमच्या न्यायालयाच्या केस संदर्भातले हक्क काही महिन्यांसाठी त्या व्यक्तीकडे देऊन जाऊ शकतात. ही व्यक्ती सहा महिन्यांसाठी किंवा तुम्ही भारतात परतण्यापर्यंत तुमच्या केसच्या तारखांना उपस्थित राहू शकते व गरज लागल्यास तुमच्या वतीने सही करू शकते. परंतु असे निर्णय घेऊ शकत नाही, जे तुमच्या कायद्याने विरोधात जातील किंवा तुम्हाला खूप नुकसान करतील. कालांतराने तुम्ही जेव्हा भारतामध्ये परताल, तेव्हा हे कुलमुखत्यार पत्र रद्द करू शकता.
प्रश्न : आमचा न्यायालयात खटला सुरू आहे, आम्ही वकीलदेखील दिलेले आहेत. परंतु आमचे वकील तारखेला हजर राहत नाहीत व त्यामुळे विरोधी पक्षाचे वकील फायदा घेतात. आमच्यावर विविध आरोप करतात व न्यायाधीश सतत आम्हाला सांगतात की, ‘‘तुमच्या वकिलांना फोन करून बोलून घ्या.’’ आम्ही वकील बदलू शकतो का?
उत्तर : नक्कीच तुम्ही वकील बदलू शकता. तुमचे वकील का येत नाहीत, या कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे. पक्षकार चालू केसमध्ये कितीही वेळा आपले वकील बदलू शकतात. परंतु आधीच्या वकिलाकडून त्यांचे हरकत नसल्याची सही आणणे गरजेचे असते. तुम्ही वकील बदलल्याने तुमच्या केसवर विपरीत परिणाम होईल,
असा विचार करू नका. योग्य तो वकील घेणे तसेच तुम्हाला हवे असल्यास वकील बदलणे हा पक्षकारांचा अधिकार आहे. वकिलांची नियुक्ती करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे नसल्यास तुम्ही न्यायालयाकडे विनंती करून मोफत वकील नियुक्त करून घेऊ शकता.