प्रारूप प्रभागरचनेवरील २५० हरकतींवर सुनावणी
पुणे, ता. ३ : जिल्ह्यातील १४ नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभागरचनेवर दाखल हरकती-सूचनांवर सुनावणी घेण्यास जिल्हा प्रशासनाने सुरूवात केली आहे. आज पहिल्याच दिवशी २५० हरकती आणि सूचनांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासमोर सुनावणी झाली.
जिल्हा प्रशासनाकडे १४ नगरपरिषदांसाठी २८२ आणि तीन नगरपंचायतींसाठी १३६ हरकती प्राप्त झाल्या आहेत. बुधवारी बारामती, लोणावळा, दौंड, तळेगाव, शिरूर, जुन्नर आणि फुरसुंगी-उरुळी देवाची या नगरपरिषदा तसेच माळेगाव नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर १८० हरकतदारांच्या उपस्थितीत २५० हरकतींवर सुनावणी झाली.
गुरुवारी (ता. ४) सासवड, भोर, चाकण, आळंदी, राजगुरुनगर या नगरपरिषदा तसेच मंचर आणि वडगाव मावळ नगरपंचायतींच्या उर्वरित १६८ हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतली जाणार आहे. तर नव्याने स्थापन झालेल्या फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतून ६६ हरकती प्राप्त झाल्या आहेत.
राजगुरूनगरमधून ५१, भोरमधून ४६, सासवडमधून ३२, लोणावळ्यातून ३०, आळंदीमधून २३ तर तळेगाव आणि जुन्नरमधून प्रत्येकी एक हरकत जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. इंदापूर आणि जेजुरी नगरपरिषदेतून प्रारूप रचनेवर एकही हरकत आलेली नाही. तर माळेगाव बुद्रूक नगरपंचायतीतून १३६ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. वडगाव आणि मंचर येथून एकही हरकत नोंदविण्यात आलेली नाही, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
प्रारूप प्रभागरचना करताना नैसर्गिक हद्द विचारात घेतली नाही, नदी-नाल्यांच्या पलीकडे प्रभाग तयार केल्याची, वस्ती एकसंध न ठेवल्याच्या हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. नगरपरिषदांसाठी ९ ते ११ सप्टेंबर आणि नगरपंचायतींसाठी ९ ते १५ सप्टेंबरदरम्यान प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करून अंतिम मान्यतेसाठी नगरविकास विभागाकडे पाठविणार आहे तर २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान अंतिम प्रभागरचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.