आनंदसोहळ्याची आज सांगता
पुणे, ता. ५ : गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या श्रद्धा आणि भक्तीच्या आनंदसोहळ्याची शनिवारी (ता. ६) सांगता होणार आहे. लाडक्या गणरायाला दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने निरोप देण्यासाठी मंडळे सज्ज झाली आहेत. विसर्जन मिरवणुकीतील सहभागावरून मंडळांमध्ये झालेल्या मतभेदाचा तिढा सुटला असला तरी प्रत्यक्ष मिरवणूक कशी पार पडणार, याकडे गणेशभक्तांचे लक्ष लागले आहे.
गणेश चतुर्थीच्या मंगल मुहूर्तावर सुरू झालेल्या गणेशोत्सवाने शहरात सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. या १० दिवसांत मानाच्या गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेण्याची ओढ आणि देखावे पाहण्याचा उत्साह भाविकांना होता. आता या उत्सवाचा कळसाध्याय वैभवशाली विसर्जन मिरवणुकीने गाठला जाणार आहे. गणरायाला निरोप देताना डोळे पाणावणार असले तरी विसर्जन मिरवणुकीत कोणतीही कसर राहू नये, यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. मिरवणुकीसाठी भव्य रथ, आकर्षक पालख्या सज्ज झाल्या आहेत.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे शनिवारी (ता. ६) सकाळी ९.३० वाजता महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. सर्वप्रथम मानाचे पहिले पाच गणपती लक्ष्मी रस्त्यावरून मार्गस्थ होणार आहेत. प्रत्येक मंडळासमोर कोणते बँडपथक आणि ढोल-ताशा पथक असणार, मिरवणूक कशी मार्गक्रमण करणार, याचे नियोजन करण्यात आले आहे. पोलिस आणि महापालिका प्रशासन मिरवणुकीसाठी सज्ज झाले आहेत. विसर्जन मिरवणुकीसाठी आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.
१) मानाचा पहिला गणपती- ग्रामदैवत श्री कसबा गणपती सार्वजनिक मंडळ :
श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची मिरवणूक पारंपारिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून निघणार आहे. सकाळी ९.३० वाजता आरती झाल्यानंतर बेलबाग चौकातून मिरवणूक मार्गस्थ होईल. मिरवणुकीच्या अग्रभागी प्रमोद गायकवाड यांचे सनईवादन आणि देवळणकर बंधूंचे चौघडावादन होणार आहे. प्रभात बँड आणि ढोल-ताशा पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
२) मानाचा दुसरा गणपती- ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ :
श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूकही पारंपारिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून निघणार आहे. अब्दागिरी, मानचिन्हांसह गणराय विराजमान असलेली ही चांदीची पालखी कार्यकर्ते आपल्या खांद्यावरून नेणार आहेत. मिरवणुकीत सतीश आढाव यांचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बँड आणि ढोल-ताशा पथकांचा सहभाग असेल.
३) मानाचा तिसरा गणपती- श्री गुरुजी तालीम गणपती मंडळ :
स्वप्नील आणि सुभाष सरपाले यांनी तयार केलेल्या ‘हर हर महादेव’ या फुलांच्या आकर्षक रथातून श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणरायाची मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन असेल. तसेच अश्वराज ब्रास बँड, अतुल बेहरे यांचे नादब्रह्म ढोल-ताशा पथक, नादब्रह्म ट्रस्टचे ढोल-ताशा पथक आणि गर्जना ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहे. परंपरेप्रमाणे मिरवणुकीत गुलालाची उधळण होणार आहे.
४) मानाचा चौथा गणपती- तुळशीबाग गणपती मंडळ :
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या १२५ व्या वर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता मयूर रथातून निघणाऱ्या वैभवशाली मिरवणुकीने होणार आहे. मयूर रथावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार असून या रथामध्ये हायड्रोलिक पद्धतीचा वापर केला जाणारा आहे. रथाची उंची ३५ फूट इतकी असून हा रथ १६ फूट रुंद आणि २४ फूट लांब असणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी लोणकर बंधू यांचा नगारा असून ढोल-ताशा पथके देखील सहभागी होणार आहेत.
५) मानाचा पाचवा गणपती- केसरीवाडा गणपती मंडळ :
केसरीवाडा गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत श्रीराम, शिवमुद्रा, स्वराज्य ट्रस्ट ढोल-ताशा पथकांचा समावेश असणार आहे. बिडवे बंधूंचे नगारा वादन, इतिहासप्रेमी मंडळाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज
समाधी जीर्णोद्धार’ हा देखावा असणार आहे. प्रथेप्रमाणे गणराय पालखीत विराजमान असतील; तसेच ‘कथकली मुखवट्या’चा रथ सहभागी होईल. ‘हरवलेला पोस्टमन’ ही स्वराज्य ट्रस्ट ढोल-ताशा पथकाची संकल्पना असणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट :
सलग तिसऱ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दुपारी ४ वाजता बेलबाग चौकातून मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. दगडूशेठ हलवाई गणपती यंदा श्री गणनायक रथामध्ये विराजमान होणार आहेत. आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे. यंदाचा देखावा असलेल्या केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे. रथाचा आकार १६ बाय १६ फूट असून उंची २४ फूट इतकी आहे. मिरवणुकीत मानवसेवा रथ व सनई-चौघडा अग्रभागी असणार आहे. स्वरूपवर्धिनीचे पथक, केरळचे चेंदा मेलम पथक सहभागी होणार आहेत.
अखिल मंडई गणपती मंडळ :
अखिल मंडई मंडळाची सांगता मिरवणूक सायंकाळी ६ वाजता निघणार आहे. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ‘श्री गणेश सुवर्णयान’ हा रथ साकारण्यात आला आहे. श्री गणेश सुवर्णयानाचे स्वरूप जहाजासारखे असून रथाचा आकार २५ फूट लांब आणि १६ फूट रुंद असा आहे. रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन, त्यामागे गंधर्व बँड तसेच शिवगर्जना पथकाचे वादन होणार आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ :
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन मिरवणुकीला सायंकाळी सहा वाजता सुरूवात होईल. मंडळाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक आकर्षक पद्धतीने सजवलेल्या ‘श्री गणेश रत्न रथा’तून निघणार आहे. या रथासमोर श्रीराम आणि रमणबाग ही पथके पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशा वादन करणार आहेत.
वैद्यकीय मदत :
गणेश विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासासह खासगी डॉक्टरांची पथके आणि रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. मिरवणुकीच्या प्रमुख मार्गांवर ही वैद्यकीय पथके आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवणार आहेत.
१) रुग्णवाहिकांची ठिकाणे :
बेलबाग चौक, पूरम चौक, नारायण पेठ पोलिस चौकी, केळकर रस्ता, अप्पा बळवंत चौक, स. प. महाविद्यालय चौक, टिळक रस्ता
- ‘रोटरी क्लब ऑफ पुणे मिड टाऊन यांची रुग्णवाहिका फिरती
आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी संपर्क :
- प्रा. डॉ. मिलिंद भोई, विश्वस्त- विघ्नहर्ता न्यास, पुणे पोलिस : ९८२२०९७५५५
- डॉ. शंतनू जगदाळे, विश्वस्त- विघ्नहर्ता न्यास, पुणे पोलिस : ९०११९१६६०७
- डॉ. नंदकुमार बोरसे, सर्जन, शेठ ताराचंद रुग्णालय, पुणे : ९४२२०३२६९६
- डॉ. नितीन बोरा : ९८२२९६९६६१
दोन मंडळांची संयुक्त मिरवणूक
लक्ष्मी रस्त्यावरील श्री गजानन मंडळाचे यंदा ८६ वे वर्ष असून श्री गरुड गणपती मंडळाचे यंदा ८२ वे वर्ष आहे. प्रत्येक वर्षी पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला होणारा विलंब पाहून दोन्ही मंडळांनी संयुक्त विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. यंदा संयुक्त विसर्जन मिरवणुकीचे ११ वे वर्ष आहे.
रविवारी खग्रास चंद्रग्रहण
यंदा रविवारी (ता. ७) भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण असून हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे. रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी ग्रहण सुरु होणार असून उत्तररात्री १ वाजून २७ मिनिटांनी ग्रहण संपेल. ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरु होत असल्याने दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत. वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जप, श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत, मात्र अन्य आवश्यक नित्यकर्मे करता येतील. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी सायंकाळी सव्वापाच वाजेपासून ग्रहणाचे वेध पाळावेत. काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी देखील गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरु असतात. अशा ठिकाणी रात्री ९ वाजेपूर्वी गणेशाचे विसर्जन करावे, अशी माहिती दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.