कुमठेकर रस्त्यावरील मंडळांचे ‘आस्ते कदम’
पुणे, ता. ७ : ढोल-ताशांचा गजर, डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या आकर्षक रांगोळ्या, संतांचे पुतळे व पौराणिक देखाव्यांनी नटलेले रथ, चिमुकल्या वादकांनी केलेले ढोलवादन असे नयनरम्य दृश्य कुमठेकर रस्त्यावरील मिरवणुकीदरम्यान पाहायला मिळाले. दिवसा पारंपरिक वाद्य व रात्री ‘डीजे’च्या आवाजावर तरुणाईची पावले थिरकली. यंदा या रस्त्यावरून ६१ मंडळांनी विसर्जनासाठी मार्गक्रमण केले. गेल्यावर्षी ही संख्या ५४ होती. कुमठेकर रस्त्यावरील गणेश मंडळांनी ‘आस्ते कदम’ टाकत मिरवणूक रविवारी सकाळी साडेनऊला संपविली.
धीम्या गतीने चालत असूनही लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता या प्रमुख रस्त्यांच्या आधी म्हणजेच रविवारी सकाळी साडेनऊला कुमठेकर रस्त्यावरील मिरवणूक संपली. यात त्रिमूर्ती मित्रमंडळाच्या मूर्तीचे विसर्जन शेवटचे ठरल्याची माहिती ‘विघ्नहर्ता न्यास’चे ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी दिली.
शनिवारी सकाळी अकरा वाजता या रस्त्यावरी फडतरे चौकात व आजूबाजूच्या उपरस्त्यांवर मंडळांनी सजविलेले नयनरम्य रथ व ‘डीजे’च्या भिंती असलेली वाहने हे रांगा लावून रस्त्याच्या कडेला उभी होती. फडतरे चौकातून शनिवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी ज्ञान प्रबोधिनी हे पहिले मंडळ मार्गस्थ झाले. तेव्हापासून शनिवारी रात्री मध्यरात्रीपर्यंत १३ तासांमध्ये अवघी १२ मंडळे मार्गस्थ झाली होती. इतक्या धीम्या गतीने कुमठेकर रस्त्यावर मंडळांचे मार्गक्रमण सुरू होते. मात्र, मध्यरात्रीनंतर त्यांना वेग आला. रात्री बारा ते रविवारी सकाळी साडेनऊपर्यंतच ४८ मंडळे मार्गस्थ झाली.
शनिवारी सकाळी मिरवणुकीला ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात सुरुवात झाली. मोकळा रस्ता व दोन मंडळातील अंतर बरेच असल्याने पथके निवांतपणे वादन करत मार्गक्रमण करत होती. सायंकाळ होताच मिरवणुकीला रंग चढायला सुरवात झाली. दिवसाच्या ढोल-ताशा या पारंपरिक वाद्यांची जागा ही रात्रीच्या वेळी ‘डीजे’ने घेतली. रात्री १२ वाजले, मात्र ‘डीजे’ चा आवाज शांत होईपर्यंत तरुणाई थिरकत होती. रात्री बारानंतर मंडळे पटापट पुढे गेली.
रथांच्या आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष...
कुमठेकर रस्त्यावरील मंडळांनी विविध विषयांवर संदेश देत रथांची सजावट केली होती. यामध्ये रस्ता-खालकर चौक मित्रमंडळाने हनुमान रथ सजविला होता. मयूरेश मित्रमंडळाने संत तुकोबा, ज्ञानोबाची मूर्ती रथावर विराजमान केल्या होत्या. विश्रामबाग मित्रमंडळाने फुलांचा रक्त बीज रथ सजविला होता. त्यामध्ये शंकराची पिंड व इतर सजावट ही सुंदर फुलांमध्ये केली होती. श्री सेवा मंडळाने युनेस्को हेरिटेजमध्ये समावेश झालेल्या किल्ल्यांच्या छायाचित्रांचा रथ सजविला होता. मिरवणुकीत बाल गणेश मंडळातील चिमुकल्या वादकांनी सर्वांचे लक्ष वेधले. लहान मुली व मुलांनी यावेळी लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा चालवून युद्धदकलेच्या प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थितांना थक्क केले.
मिरवणुकीची ठळक वैशिष्ट्ये
- उशिरा मिरवणुकीला सुरुवात होऊनही लवकर सांगता
- दोन मंडळांमधील अंतरामुळे मिरवणूक रेंगाळली
- सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यंत केवळ १२ मंडळे मार्गस्थ
- दिवसा पारंपरिक वाद्य, तर रात्री ‘डीजे’चा दणदणाट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.