मानाच्या गणपतीचे विसर्जन
श्री कसबा गणपती :
श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या फुलांनी सजविलेल्या चांदीच्या पालखीतून विराजमान गणरायाचे महात्मा फुले मंडईत सकाळी नऊच्या सुमारास आगमन झाले. श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची मिरवणूक पारंपारिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून निघाली. मंडईतून सकाळी साडेनऊ वाजता कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकाकडे मार्गस्थ झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी प्रमोद गायकवाड यांचे सनईवादन आणि देवळणकर बंधूंचे चौघडा वादन होते. गेल्या ८७ व्या वर्षांची परंपरा असणाऱ्या प्रभात बॅण्डच्या वादनाने मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत कामायनी संस्थेच्या पथकाने पर्यावरण संवर्धन आणि रक्षणचा संदेश देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय रमणबाग, परशुराम आणि रुद्रगर्जना ढोल-ताशा पथकांनी विविध ताल वाजवत भाविकांना भारावून टाकले. आनंद, उत्साह, मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या गुढी हातात घेऊन कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.
- विसर्जनाची वेळ : दुपारी ३.४७ वाजता
(नटेश्वर घाट)
श्री तांबडी जोगेश्वरी :
श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने चांदीच्या पालखीतून गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली. मिरवणुकीच्या अग्रभागी सतीश आढाव यांचे नगारावादन आणि न्यू गंधर्व ब्रास बॅण्डच्या सादरीकरण अशा जल्लोषपूर्ण वातावरणात गणरायाचे बेलबाग चौकात आगमन झाले. या मिरवणुकीत मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाने साकारलेली ‘तांबडी जोगेश्वरी’. पथकातील महिला कलाकाराने संपूर्ण मिरवणुकीत ‘तांबडी जोगेश्वरी’ची भूमिका साकारली. तर या पथकाने ढोल-ताशा वादनातून देवीचा जागरण गोंधळ मांडला. या अनोख्या सादरीकरणाने भाविकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. अब्दागिरी, मानचिन्हांसह मंडळाचे कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. ताल ढोल-ताशा पथकानेही या वेळी वादन केले.
- विसर्जन वेळ : ४.०८ वाजता
(नटेश्वर घाट)
गुरुजी तालीम मंडळ :
गुरुजी तालीम मंडळाचे गणराय शिव-पार्वती साकारलेल्या ‘हर हर महादेव’ या फुलांच्या आकर्षक रथातून मिरवणुकीत आले. मिरवणुकीच्या सुरूवातीलाच महात्मा फुले मंडईतच ढोल-ताशा पथकांनी जवळपास एक तास वादन केल्यानंतर गणपतीचा रथ मंडईतून लक्ष्मी रस्त्याकडे मार्गस्थ झाला. जयंत नगरकर यांचे नगारावादन आणि अश्वराज ब्रास बॅण्डचे सादरीकरण लक्ष वेधणारे होते. गर्जना, नादब्रह्म, अतुल बेहेरे यांचे नादब्रह्म या पथकांनी दमदार वादन केले. संपूर्ण मिरवणुकीत गुलालाची मुक्त उधळण करत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उडत्या चालीच्या गाण्यांवर उपस्थितांना थिरकायला लावले.
- विसर्जनाची वेळ : सायंकाळी ४.३४ वाजता
(नटेश्वर घाट)
तुळशीबाग गणपती मंडळ :
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या गणरायाची फुलांची आकर्षक सजावट असणाऱ्या मयूर रथातून वैभवशाली मिरवणूक निघाली. रथात हायड्रॉलिक पद्धतीचा वापर करण्यात आला होता. रथाची उंची ३५ फूट इतकी असून हा रथ १६ फूट रुंद आणि २४ फूट लांब होता. मिरवणुकीच्या अग्रभागी लोणकर बंधूंचे नगारा वादन होते. ‘स्व-रूपवर्धिनी पथकाने ‘अफजलखानाचा वध’ हा जिवंत देखावा, तर मल्लखांब क्रिडा प्रकाराद्वारे ‘कालिया मर्दन’ हा देखावा सादर केला. श्री गजलक्ष्मी आणि शिवमुद्रा ढोल-ताशा पथकांच्या उत्स्फूर्त वादनाला भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. मंडळाच्या गणरायाचे टिळक चौकात शनिवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास आगमन झाले.
- विसर्जनाची वेळ : सायंकाळी ४.५८ वाजता
(पांचाळेश्वर घाट)
केसरीवाडा गणपती :
केसरीवाडा गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत गणरायाचे
‘कथकली मुखवट्या’च्या रथातून आगमन झाले. मिरवणुकीच्या अग्रस्थानी बिडवे बंधूचे नगारा वादन वैशिष्ट्यपूर्ण ठरले. संदेश पोचविण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या विविध आधुनिक साधनांमुळे काळाच्या ओघात पोस्टमन हरवले आहेत. या मिरवणुकीत स्वराज्य ट्रस्ट ढोल-ताशा पथकाने ‘हरवलेला पोस्टमन’ या संकल्पनेवर आधारित आणि पोस्टमनची वेशभूषा करत संपूर्ण मिरवणुकीत वादन केले आणि हाच मुख्य मिरवणुकीत कौतुकाचा विषय ठरला. ‘अरे, टपाल खात्याचे पण ढोल-ताशा पथक आहे का?’ ‘यंदा टपाल खात्याने देखील ढोल ताशा पथक काढले वाटतं’, अशी चर्चा भाविकांमध्ये होती. तर, काही भाविक स्वत:हून पथकातील वादकांना वेशभूषेबाबत विचारणा करत होते आणि या अनोख्या संकल्पनेबाबत वादकांनी कौतुकाची थाप मिळवली. इतिहासप्रेमी मंडळाने ‘शिवछत्रपती समाधी जीर्णोद्धार शताब्दी २०२५-२६’ निमित्त सादरीकरण केले. शिवमुद्रा, श्रीराम ढोल-ताशा पथकांचे वादन झाले.
- विसर्जनाची वेळ : सायंकाळी ५.३८ वाजता
(पांचाळेश्वर घाट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.