मेट्रोला एकाच दिवसात सहा लाख प्रवासी
पुणे, ता. ७ : शहरची उपनगरे आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे अनंत चर्तुदर्शीच्या दिवशी (शनिवारी) सुमारे सहा लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. मेट्रोने पहिल्यांदाच शहरात एकाच दिवशी एवढी मोठी प्रवासी संख्या अनुभवली. तर पूर्ण उत्सवात सुमारे ४० लाख प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला.
स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवर प्रवाशांनी मेट्रोचा मोठा वापर केला. शहराच्या मध्यभागातील महात्मा फुले मंडई स्थानकावरून सर्वाधिक म्हणजे ६६ हजार ५४२ प्रवाशांनी प्रवास केला. त्या खालोखाल डेक्कन जिमखाना स्थानकावरून ६४ हजार ७०३, पिंपरी-चिंचवड महापालिका ४८ हजार ३६३, स्वारगेट ४४ हजार ९१७ आणि पुणे महापालिका ३९ हजार २०८ प्रवाशांनी वाहतूक केली. प्रवाशांच्या गर्दीमुळे मेट्रो स्थानके गजबजून गेली होती. रविवारी सकाळीही मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला. शनिवारी दोन्ही मार्गांवर मेट्रोच्या ८६६ फेऱ्या झाल्या. त्यात शिवाजीनगर न्यायालय स्थानक ते स्वारगेट दरम्यान सात आणि वनाज ते शिवाजीनगर न्यायालय स्थानकादरम्यान १५ जादा फेऱ्या झाल्या. दोन्ही मार्गांवर १५ अधिकच्या फेऱ्या झाल्या.
मेट्रोला प्रवाशांची चांगली पसंती मिळणार, याचा अंदाज महामेट्रोला होताच. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या होत्या. १२ तासांच्या दोन शिफ्टमध्ये सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांनी मेट्रोत वाढलेल्या गर्दीचे नियोजन केले, अशी माहिती पुणे मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबेकर यांनी दिली.
मेट्रोची यंदा स्वारगेट, महात्मा फुले मंडई आणि कसबा पेठ ही स्थानके यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांसाठी खुली झाली. त्यामुळे उपनगरांतून थेट शहराच्या मध्यभागात भाविकांना पोचणे शक्य झाले. त्यामुळेही गणेशोत्सवातील गर्दी वाढली.
उत्साहाला मेट्रोचा हातभार
मेट्रोची सेवा उपलब्ध झाल्यामुळे यंदा गणेशोत्सवातील गर्दी वाढल्याचे दिसून आले. शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यात उपनगर, शहराबाहेरील भाविकांचे प्रमाण मोठे होते. बाहेरगावांतील तसेच उपनगरांतील नागरिकांनी मेट्रो स्थानकाजवळ त्यांची वाहने उभी करून पुढे शहरात येण्यास आणि परतण्यास पसंती दर्शविली.
गणेशोत्सवात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान तब्बल ३९ लाख ६० हजार ९३७ प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला. त्यातून ५ कोटी ६६ लाख ७१ हजार ६९१ रुपयांचे उत्पन्न मेट्रोच्या तिजोरीत जमा झाले. गणेशोत्सवामुळे मेट्रोला पहिल्यांदाच एवढ्या संख्येने प्रवासी उपलब्ध झाले. उत्सवात सर्वाधिक म्हणजे ५ लाख ९० हजार ९४४ प्रवासी संख्या शनिवारी होती. दोन्ही मार्गांवरील मेट्रोची सरासरी प्रवासी संख्या एरवी दोन लाख २० हजारांच्या आसपास असते. परंतु, यंदा उत्सवात सात दिवस मेट्रोची दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या तीन लाखांपेक्षा जास्त होती.
गणेशोत्सवातील प्रवासी संख्या
२७ ऑगस्ट - २ लाख २८ हजार
२८ ऑगस्ट - २ लाख ३६ हजार
२९ ऑगस्ट - २ लाख ६० हजार
३० ऑगस्ट - ३ लाख ६८ हजार
३१ ऑगस्ट - ३ लाख २१ हजार
१ सप्टेंबर - ३ लाख १२ हजार
२ सप्टेंबर - ३ लाख ०२ हजार
३ सप्टेंबर - ३ लाख ५८ हजार
४ सप्टेंबर - ३ लाख ९७ हजार
५ सप्टेंबर - ३ लाख ३९ हजार
६ सप्टेंबर - ५ लाख ९० हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.