सुदृढ वार्धक्य: आयुष्याची नवी उर्मी
सुदृढ वार्धक्य : आयुष्याची नवी ऊर्मी...
‘वार्धक्य’ म्हणजे अनुभवाने आलेले सामंजस्य, जबाबदारीतून आलेले मोठेपण व समाधानातून मिळणारे स्थैर्य हे जरी खरे असले तरी प्रत्यक्षात ते दुखणारे सांधे, थकलेले शरीर आणि जाणारा तोल याचेच समीकरण होताना दिसते. त्यातच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यासारखे सोबती त्यात भर घालतात. परिणामी वार्धक्य एक आव्हान होऊन बसते. ८ सप्टेंबर हा ‘जागतिक फिजिओथेरपी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त यावर्षीचा विषय हा ‘वृद्धांच्या आरोग्य विषयक समस्या’ हा जाहीर करण्यात आला आहे. त्यावर टाकलेला प्रकाशझोत.....
------------------------------------------------------------------------
जागतिक आरोग्य संघटनेनुसार वार्धक्य म्हणजे शरीरातील पेशींचा कालानुरूप होणारा ऱ्हास; ज्यामुळे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांची कार्यक्षमता कमी होते. यामध्ये संधिवात होणे, ज्ञानेंद्रिय आणि मेंदूचे कार्य कमी झाल्याने तोल जाणे, फुफ्फुस आणि हृदयाची कार्यक्षमता घटल्याने दम लागणे हे बदल दिसून येतात. त्याचबरोबर स्मरणशक्ती कमी होणे, नैराश्य, निद्रानाश यासारखी लक्षणेही दिसतात. याचा एकत्रित परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या आत्मविश्वासावर आणि जीवनशैलीच्या गुणवत्तेवर (क्वालिटी ऑफ लाइफ) होतो. सध्या भारतात १४-१५ कोटी ज्येष्ठांची संख्या असून, ती २०५० पर्यंत दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. सुदृढ वार्धक्य म्हणजे उतारवयात कार्यशीलता आणि सहभाग सांभाळणे. या संकल्पनेत शारीरिक आणि मानसिक आरोग्याबरोबर सामाजिक सहभाग आणि अनुकूल वातावरण निर्मिती यांचाही समावेश आहे.
‘फिजिओथेरपी’मध्ये व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलातून उतारवयातील समस्या आणि लक्षणे आटोक्यात ठेवता येतात. शास्त्रशुद्ध आणि नियंत्रित व्यायामातून स्नायूंची ताकद आणि कार्यक्षमता वाढते, सांध्यांना स्नायूंचा आधार मिळतो. योग्य व्यायामाने ताकद, सहनशक्ती आणि लवचिकतेबरोबरच तोल सुधारतो. मधुमेह, रक्तदाब नियंत्रणात राहतो. स्नायूंना ताण देणे, ताकद वाढवणारे व्यायाम (डंबेल, जोर, बैठक), सहनशक्ती वाढवणारे व्यायाम (चालणे, पोहणे, एरोबिक नाच) यांचा समावेश होतो. फक्त तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाने व्यायाम केल्यास उत्तम.
व्यायामामुळे शरीरात जी संप्रेरके स्रवतात; त्याचा स्मरणशक्ती, नैराश्यावर पण सकारात्मक परिणाम दिसून येतो; ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. सामूहिक व्यायाम, सिनिअर सिटीझन क्लब, हास्य क्लब, योग क्लब यासारखे उपक्रम शारीरिक-मानसिक आरोग्याबरोबरच सामाजिक सहभागही वाढवतात. नैराश्य किंवा एकटेपणाच्या भावनेतून बाहेर काढायला आपण आजी-आजोबा, आई-बाबा यांना नियमित व्यायाम, व्याधी अंगावर न काढता डॉक्टरांचा/ फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यांच्यासाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे आणि त्यांना मानसिक आधार देणे आपले कर्तव्य आहे. यामुळे उतारवय हा त्रास न राहता एक आनंददायी अनुभव होईल आणि सुदृढ वार्धक्यामुळे आयुष्याला नवी ऊर्मी मिळेल.
- डॉ. प्रा. प्राजक्ता सहस्रबुद्धे, संचेती इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक अँड रिहॅबिलिटेशन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.