दीड हजारांहून अधिक भाविकांवार उपचार
पुणे, ता. ७ : विसर्जन मिरवणुकीत अचानक अस्वस्थ वाटणाऱ्या भाविक, बंदोबस्तावरील पोलिस अशा दीड हजारांहून अधिक भाविकांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळाला. त्यापैकी ५९ जणांना खासगी, सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली. सुदैवाने यामध्ये कोणी गंभीर झाल्याचे किंवा मृत्यूची नोंद झाली नाही. पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यास, डायल १०८ रुग्णवाहिका, जनकल्याण फाउंडेशन व इतर संस्थांतर्फे ही सेवा पुरविण्यात आली.
शहर व जिल्ह्यात मिरवणुकीच्या मार्गांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणी डायल १०८ आपत्कालीन २५ रुग्णवाहिका नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. ३४२ रुग्णांवर रुग्णवाहिकेत उपचार झाले. तर ११ रुग्णांना जास्त त्रास जाणवू लागल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रियांक जावळे यांनी दिली.
पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यास कडून एकूण ७२२ गणेशभक्तांवर आपत्कालीन उपचार केले. यापैकी ५२ पोलिस बांधवांचा समावेश होता. तर, ४८ रुग्णांना तातडीच्या उपचारासाठी विविध रुग्णालयात भरती केले. बेलबाग चौकासह विविध ठिकाणी हे पथके होते. यामध्ये पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यास चे विश्वस्त प्रा. डॉ. मिलिंद भोई, डॉ. शंतनू जगदाळे, सर्जन डॉ. नंदकिशोर बोरसे यांच्या नेतृत्वात १२४ डॉक्टर्स, स्वयंसेवक, वॉर्ड बॉय, परिचारिका, रुग्णवाहिका, आपत्कालीन उपचार तज्ज्ञ यांचा समावेश होता. त्यांना शेठ ताराचंद रुग्णालय, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, मदरहुड रुग्णालय, माय माऊली ॲम्ब्युलन्स, ओम ॲम्बुलन्स, जीवनरक्षा ॲम्ब्युलन्स तसेच डॉ. नितीन बोरा, डॉ. प्रीती व्हिक्टर, डॉ. कुणाल कामठे, सदाशिव कुंदेन, जयशंकर माने, डॉ. उदय झेंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
विविध स्वयंसेवी संस्थांचीही मदत
जनकल्याण फाउंडेशनतर्फे टिळक चौकात पुणे पोलिस, महानगरपालिका यांच्या सहकार्याने प्रथमोपचार केंद्र उभारले होते. याठिकाणी भारती रुग्णालय, ताराचंद रुग्णालय तसेच डॉ. बाळकृष्ण गायकवाड आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने उपचार सुरू होते. या केंद्रातर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे दोन रुग्णवाहिकाच्या माध्यमातून सेवा दिली, युवा अस्मिता फाउंडेशनने उपचारांसाठी पुढाकार घेतला होता. या केंद्रांच्या माध्यमातून सहाशेपेक्षा अधिक भाविकांवर उपचार करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष जाधव, उपाध्यक्ष अमर जेधे, सुरेश सकपाळ, हेमंत मोरे, वैशाली वंजे, मनोज कचरावत, संध्या माळी, किरण गहेरवार आदींनी परिश्रम घेतले. मॉडर्न विकास मंडळ व स्मार्ट पुणे फाउंडेशन यांनी उपचार दिले. डॉ. संदीप बुटाला, डॉ. तुषार जगताप, डॉ. प्रसाद आंबीकर, डॉ.धर्मेंद्र शहा, डॉ. राजेंद्र खेडेकर, डॉ. मनिषा जाधव यांनी रुग्णांची तपासणी केली.
प्रमुख वैद्यकीय तक्रारी
- घाम येऊन निर्जलीकरण, चक्कर येऊन पडणे
- जास्त काळ मोठ्या आवाजामुळे रक्तदाब वाढणे, कान दुखणे, चिडचिड होणे
- ज्येष्ठ नागरिक, छोटी मुले यांचा खूप प्रमाणात कान दुखणे
- अनेक ठिकाणी रंगीत धूर, भस्म वापर त्यामुळे खोकला, दम लागणे, गुदमरणे अशी लक्षणे
- ढोल ताशा वाजवताना ढोल, टिपरी लागून अपघात
- ‘डीजे’ला खेटून उभे राहून नाचणाऱ्यांना कानदुखी, बहिरेपणा
- ट्रॅक्टरचे चाक पायावरून जाऊन झालेले फ्रॅक्चर्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.