मंडळांचा क्रम चुकला अन्...

मंडळांचा क्रम चुकला अन्...

Published on

पुणे, ता. ७ : विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या क्रमवारीत अचानक झालेल्या बदलांमुळे बेलबाग चौकातील नियोजन विस्कळित झाले. गेली अनेक वर्षे क्रमाने येणाऱ्या प्रमुख मंडळांचा क्रम यंदा चुकला. मानाचे पाच गणपती लक्ष्मी रस्त्यावरून मार्गस्थ झाल्यानंतर उत्सुकता असते ती दगडूशेठ गणपती मंडळ ट्रस्टनंतर सायंकाळी क्रमाने येणाऱ्या जिलब्या मारुती, हुतात्मा बाबू गेनू, श्रीमंत भाऊ रंगारी आणि त्यांनतर अखिल मंडई गणपती मंडळ या प्रमुख मंडळांची. यंदा मानाचे गणपती मार्गस्थ झाल्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत केवळ दहा गणपती मंडळे चौकातून पुढे गेली होती. कुमठेकर रस्त्यावरील शगुन चौकातून यंदा काही मंडळे मध्येच शिरली. त्यामुळे मिरवणुकीला विलंब होण्यास सुरुवात झाली.
पुढे जाण्यासाठी मंडळांमध्ये स्पर्धा सुरू होती. सात वाजेपर्यंत अपेक्षित २७ पैकी १५ मंडळेच चौकातून मार्गस्थ झाली. शिवाजी रस्त्यावर तसेच सिटी पोस्टाकडील रस्त्यावरून येणाऱ्यांसाठी बॅरिकेड घालण्यात आले नाहीत. त्यामुळे दोन्ही रस्त्यांकडून येणारी मंडळेही पुढे जाण्यासाठी पथके आणि वाहने पुढे रेटत होती. काही मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये पुढे जाण्यावरून वाद झाला. या मंडळाच्या पथकांमधील काही कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळे मिरवणूक लांबली. पोलिसांना न जुमानता सगळ्याच मंडळानी पुढे येण्याचा प्रयत्न केला. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मागील सर्व मंडळाच्या अध्यक्षांसह पोलिसांना भेटून चांगलेच धारेवर धरले.

महत्त्वाचे
१) मंडळ-मंडळांमध्ये तर कधी ढोल-ताशा पथकांमध्ये पुढे जाण्यावरून वादावादीचे अनेक प्रसंग घडले. गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नव्हती. त्यामुळे बेलबाग चौकात अनेकदा चेंगराचेंगरी झाली. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीसाठी वर्तमानपत्रांना पोलिस आयुक्त कार्यालयाकडून पास उपलब्ध करून दिले जातात. मात्र, त्याची दखल पोलिसांनीच घेतली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग घडले.

२) महोत्सव साजरे करणाऱ्या मंडळांना दरवर्षी लवकरच जाण्याची संधी पोलिसांकडून दिली जाते. त्यासाठी या मंडळांना क्रमांक दिले, परंतु नियोजन नसल्यामुळे काही मंडळांना संधी मिळाली, तर काही मंडळे अडकून पडली. मंडळाचे पदाधिकारी वारंवार पोलिसांना भेटून विनंती करीत होते; परंतु काहीही उपयोग झाला नाही. पोलिस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचेही प्रसंग घडले, तर बेलबाग चौकात पूर्वीप्रमाणे बॅरिकेड्स न लावल्यामुळे पोलिस, नागरिक, मंडळाचे कार्यकर्ते, ढोल-ताशा पथकाचे कार्यकर्ते आणि मंडळे असा एकच गोंधळ उडला. पर्यायाने सर्वच नियंत्रणाबाहेर गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com