जर्मनीत मराठी समुदायाकडून गणेशोत्सवाचा जल्लोष

जर्मनीत मराठी समुदायाकडून गणेशोत्सवाचा जल्लोष

Published on

पुणे, ता. ७ : जर्मनीतील ड्युसलडॉर्फ शहरात मराठी तसेच भारतीय समुदायाने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. श्रद्धा, भक्तिभाव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेली विसर्जन मिरवणूक पार पडली. गणरायाची भव्य मूर्ती शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून आकर्षक मिरवणुकीसह नेण्यात आली. १०० हून अधिक मुलींच्या लेझीम पथकाने आणि रमणबाग युवा मंचाच्या ढोल-ताशा वादनाने वातावरण दणाणून गेले.
या वेळी शहराचे आयुक्त झेपुंक्ते यांच्या उपस्थितीत सामुदायिक आरती पार पडली. त्यानंतर सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. कार्यक्रमात ड्युसलडॉर्फसह आसपासच्या शहरांतून आलेल्या भारतीय नागरिकांसोबत स्थानिक जर्मन नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. त्यामुळे हा सोहळा केवळ भारतीय समुदायापुरता मर्यादित न राहता आंतरसांस्कृतिक संवादाचा दुवा ठरला.
ड्युसलडॉर्फमधील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक वर्षातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा म्हणून ओळखली जाते. या आयोजनाचे श्रेय मराठी मित्रमंडळाला मिळाले. प्रसंगी मराठी मित्रमंडळाचे अध्यक्ष डॉ प्रसाद भालेराव म्हणाले, ‘‘गणेशोत्सव हा फक्त धार्मिक सण नसून समाजाला एकत्र आणणारा उत्सव आहे. परदेशात राहूनही आपल्या संस्कृतीचे जतन करणे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. या उत्सवामुळे समाजातील एकोपा वृद्धिंगत झाला असून, मराठी संस्कृतीला जागतिक स्तरावर नवा आयाम मिळत आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com