पुण्यात दिमाखदार मिरवणुकीला विलंबाचे गालबोट

पुण्यात दिमाखदार मिरवणुकीला विलंबाचे गालबोट

Published on

पुणे, ता. ७ ः तब्बल ३५ तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने रविवारी गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाची सांगता झाली. कोलमडलेले नियोजन, बेशिस्त यामुळे गणेशोत्सवाच्या इतिहासातील सर्वाधिक विलंबाचा नकोसा विक्रम यंदाच्या मिरवणुकीच्या नावे नोंदवला गेला. भाविकांनी आणि कार्यकर्त्यांनी मात्र अभूतपूर्व गर्दी करत जल्लोषात गणरायाला निरोप दिला. दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक रथ अन् देखाव्यांनी मिरवणूक दिमाखदार आणि वैभवशाली ठरली.
यंदा विसर्जन मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार गणेश मंडळांसह पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र हा निर्धार प्रत्यक्षात येऊ शकला नाही. गतवर्षी ३० तास १५ मिनिटांत संपलेली मिरवणूक यंदा ३४ तास ४२ मिनिटांपर्यंत चालली. मागील काही वर्षांमध्ये सकाळी १०.३० वाजता सुरू होणाऱ्या मिरवणुकीला यंदा सकाळी ९.३० लाच प्रारंभ झाला. मानाच्या पाच गणपती मंडळांनी दिलेला शब्द पाळत आठ तासात मिरवणूक संपवली. पावसानेही काही काळ हजेरी लावल्याने भाविकांचा, कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता.
लक्ष्मी रस्त्यावर रेखाटण्यात आलेल्या आकर्षक रांगोळ्या, ढोल-ताशांचे जल्लोषपूर्ण वादन यामुळे वातावरण प्रसन्न झाले होते. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची विक्रमी संख्येने उपस्थिती होती. दिवसा ढोल-ताशांच्या तालावर थिरकणारी पावले सायंकाळी डीजेच्या तालावरही थिरकली. मंडळांनी कल्पकतेने तयार केलेल्या आकर्षक अन् भव्य रथांनी भाविकांचे लक्ष वेधले होते. सायंकाळनंतर मात्र मिरवणुकीचा वेग मंदावला. लक्ष्मी रस्त्यावर अनेक मंडळांमध्ये अंतर पडत होते; तसेच मिरवणुकीत सहभागी होण्याचा क्रमही चुकला. टिळक रस्त्यावरील मिरवणूक गतवर्षीपेक्षा चार तास उशिराने संपली. काही काळ येथे गोंधळाची परिस्थिती आणि काही हाणामारीच्याही घटना घडल्या. केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यावरही मंडळांमध्ये अंतर पडत असल्याने मिरवणूक रेंगाळली. अखेर रविवारी रात्री ८ वाजून १२ मिनिटांनी अमरज्योत तरुण मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाल्यावर विक्रमी वेळानंतर मिरवणुकीची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com