प्राप्तिकर विवरणपत्रासाठी मुदतवाढीची मागणी
पुणे, ता. ८ : प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) आणि लेखा परीक्षणाच्या (टॅक्स ऑडिट रिपोर्ट) सादर करण्याच्या अंतिम तारखेत वाढ करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड भाजप चार्टर्ड अकाउंटंट्स सेलतर्फे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. वाढत्या करदात्यांची संख्या, पोर्टलवरील तांत्रिक अडचणी, तसेच पावसामुळे विस्कळित झालेले कामकाज या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पुणे विभागात २०१८-१९ मध्ये सुमारे ७५ लाख करदाते होते. २०२४-२५ या आर्थिक वर्षात हा आकडा दीड कोटीवर पोहोचल्याचा अंदाज आहे. इतक्या प्रचंड संख्येतील करदात्यांचे काम सांभाळण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट यांना अधिक वेळ मिळणे गरजेचे असल्याचे सनदी लेखापाल आघाडीचे (सीए सेल) पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष बबन डांगले यांनी स्पष्ट केले. सध्या नॉन-ऑडिट आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. तर, लेखापरीक्षण सादर करण्यासाठी ३० सप्टेंबर ही मुदत ठरविण्यात आली असून, ऑडिट प्रकरणांतील प्राप्तिकर विवरणपत्रे ३१ ऑक्टोबरपर्यंत भरायचे आहेत. मात्र, प्रत्यक्षात या तारखा पूर्ण करणे कर व्यावसायिकांसाठी कठीण ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजप सीए सेलचे सचिव शैलेश बोरे म्हणाले की, आयटीआर युटिलिटीज आणि टॅक्स ऑडिट स्कीम उशिरा प्रसिद्ध झाल्याने कामात अडथळे निर्माण झाले. पोर्टलवरील तांत्रिक त्रुटींमुळे तांत्रिक अडचणी कायम आहेत. याशिवाय जीएसटी, एमसीए यांसारख्या इतर अनुपालनांचा वाढलेला भारही मोठा अडथळा ठरत आहे.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.