मिरवणुकीत मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक
पुणे, ता. ८ : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत भाविकांचे मोबाईल चोरून पसार होणाऱ्या मालेगावमधील (जि. नाशिक) दोन चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी शिताफीने गजाआड केले. या कारवाईत पोलिसांनी १३ महागडे मोबाईल जप्त करून सुमारे एक लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता आणि बुधवार पेठ परिसरात रविवारी (ता. ७) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास विसर्जन पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. त्याच वेळी चोरट्यांनी काही भाविकांचे मोबाईल लंपास केले. याबाबत फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपास पथकातील पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पासोड्या विठोबा मंदिराजवळ पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींची ओळख अलीम मुस्ताक शेख (वय २६, रा. मालेगाव, नाशिक) आणि अत्तर अहमद एजाज अहमद (वय २५, रा. मालेगाव, नाशिक) अशी पटली. त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांचे १३ मोबाईल जप्त करण्यात आले. या कारवाईत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मेहबूब मोकाशी, तानाजी नांगरे, नितीन तेलंगे, गजानन सोनुने, महेश पवार, चेतन होळकर यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.