मिरवणूक मार्गावर दीड टन चप्पल, बुटांचा खच

मिरवणूक मार्गावर दीड टन चप्पल, बुटांचा खच

Published on

पुणे, ता. ८ : विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी शहरात पाऊस झाल्याने महापालिकेला स्वच्छतेचे काम करता आले नव्हते. रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर स्वच्छता मोहीम राबवून मिरवणूक मार्गावरून दीड टन चप्पल आणि बुटांचा कचरा उचलण्यात आला आहेच. शिवाय ७०६ टन अन्य कचरा संकलित करण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाने स्वच्छता केली असली तरी अजूनही अनेक ठिकाणी अस्वच्छता असून, डीप क्लिनिंग झालेले नाही.
गणेशोत्सव मिरवणुकीत पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थांचे रॅपर, खाद्य पदार्थांच्या स्टॉलभोवती पडलेल्या प्लेट, गणेश मंडळांकडून उधळलेले कागदांचे तुकडे, खोट्या नोटा, रंगीबेरंगी लांब कागदांचा रस्त्यावर खच पडतो. त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात गुलाल व भंडारा उधळला जातो. दरवर्षी गणेशोत्सव मिरवणूक संपल्‍यानंतर लगेच मुख्य मिरवणूक मार्ग स्वच्छ केला जातो; पण यंदाच्या वर्षी मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. रस्त्यावरील गुलाल व भंडाऱ्याचा चिखल झाला, त्यात कचरा भिजल्याने स्वच्छता मोहीम ठप्प झाली.
संध्याकाळनंतर पाऊस कमी झाल्याने रविवारी रात्री व सोमवारी दिवसभर झाडलोट व कचरा गोळ करण्याचे काम करण्यात आले. अनेक ठिकाणी चिखल काढून टाकण्यासाठी प्रशासनाने रस्ते पाण्याने धुऊन काढले. प्रशासनाकडून मिरवणूक मार्गावर करण्यात आलेल्या स्वच्छतेत ७०६ टन कचरा संकलित करण्यात आला आहे. शहर स्वच्छतेसाठी शहरात तीन हजार कर्मचारी कामाला लागले होते. त्यातील पंधराशे कर्मचाऱ्यांनी सोमवारी पहाटे रात्री दोनपर्यंत लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, डेक्कन जिमखाना, टिळक चौक, शनिवारवाडा परिसर, आदी भागात स्वच्छता केली. उपनगरांमध्ये सोमवारी दिवसभर स्वच्छता सुरू होती. प्रशासनाकडून संपूर्ण शहर स्वच्छ झाल्याचे सांगितले असले तरी अजूनही अनेक भागांत कचरा पडून आहे. तेथे स्वच्छता करणे आवश्‍यक आहे.

दृष्टिक्षेपात
- ओला कचरा - ४२० टन
- सुका कचरा - २८६ टन
- डेकोरेशन साहित्य - ३० टन
- चप्पल- बूट - १ टन ६०७ किलो

Marathi News Esakal
www.esakal.com