कुटुंब नियोजनाचे ओझेही ‘ती’च्याच खांद्यावर

कुटुंब नियोजनाचे ओझेही ‘ती’च्याच खांद्यावर

Published on

पुणे, ता. १० : मुलांच्या संगोपनाची जबाबदारी महिलांवर असते. त्‍याच्‍याव्‍यतिरिक्‍त आणखी एक जबाबदारी त्‍यांनाच पार पाडावी लागते, आणि ती म्‍हणजे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया. ही शस्त्रक्रिया (नसबंदी) पुरुषदेखील करू शकतात. याउलट पुरुषांमध्ये साधी-सोपी, कमी गुंतागुंतीची व कोणतेही दुष्‍परिणाम नसलेली ही शस्त्रक्रिया करता येते. असे असतानाही गेल्‍या वर्षी पुणे विभागात (पुणे, सातारा, सोलापूर) महिलांच्‍या तुलनेत केवळ ०.८ टक्‍केच पुरुषांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्‍याचे आरोग्‍य विभागाची आकडेवारी सांगते.
आज स्त्रिया सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्‍या बरोबरीने कार्यरत असतानाही ‘कुटुंब नियोजन’ ही दोघांची जबाबदारी आहे, हे अजूनही समाजात रुजलेले नाही. नसबंदी ही स्त्रियांनीच करावी हा मानसिक आणि सामाजिक दबावदेखील असल्‍याचे यातून दिसून येते. म्‍हणून अपत्य नियंत्रणाची जबाबदारी नकळतपणे तिच्यावर लादली जात असल्‍याचे आकडेवारीवरून दिसून येते. ही एक वास्तववादी आणि सामाजिक व समानतेच्‍या दृष्टिकोनातून चिंताजनक बाब आहे. पुणे विभागात गेल् ‍यावर्षी (२०२४-२५) खासगी व सरकारी रुग्‍णालयांमध्‍ये मिळून ५८ हजार ७०६ महिलांनी तर केवळ ५१७ पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया केली. हे प्रमाण नगण्य म्‍हणजे एक टक्कादेखील नाही.

अशी आहे स्थिती
- पाळणा लांबवायचा असल्‍यास गर्भनिरोधक गोळ्या, तांबी (आययूडी), हार्मोनल इंजेक्शन्स यांसारख्या महिलाकेंद्रित उपाययोजना आहेत
- जेव्‍हा कुटुंब नियोजन करायचे असते तेव्‍हादेखील सरकारी आणि खासगी आरोग्य यंत्रणांमध्ये प्रामुख्‍याने स्त्री नसबंदी (ट्युबेक्टॉमी) केली जाते
- कारण सतत गर्भनिरोधक गोळ्या किंवा हार्मोनल उपाय वापरण्याचा दीर्घकालीन त्रास होतो
- नसबंदी शस्त्रक्रियेसाठी किमान तीन दिवस रुग्‍णालयात राहावे लागते
- याच्या तुलनेत पुरुष नसबंदीचे (व्हॅसॅक्टॉमी) प्रमाण अत्‍यल्‍प आहे
- ही स्थिती केवळ पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांपुरतीच नव्‍हे तर राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार भारतात ९५ टक्के कुटुंब नियोजनाची जबाबदारी स्त्रियाच पार पाडतात
- पुरुषांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे

गैरसमजाने टक्‍का कमी
पुरुष नसबंदी ही सुरक्षित, सोपी व कमी गुंतागुंतीची व दहा मिनिटांमध्‍ये होणारी प्रक्रिया आहे. त्‍याने पौरुषत्वावर कोणताही परिणाम होत नाही. मात्र, त्‍याने ‘पौरुषत्वावर परिणाम होतो’, असा चुकीचा समज अजूनही आरोग्‍य यंत्रणेला खोडता आलेला नाही. सरकारी रुग्‍णालयात या शस्त्रक्रियेसाठी एक हजार रुपयांपर्यंत अनुदानही देण्‍यात येते.

पुरुष नसबंदीबाबत समाजात जागृती नसणे, गैरसमज व भीती ही कारणे दिसून येतात. कुटुंबात नसबंदीचा निर्णय घेताना ती महिलेनेच करावी, असा समज व आग्रह असतो व त्‍यासाठी त्‍या तयारदेखील होतात. पुरुष नसबंदीमुळे पौरुषत्‍वावर कोणताही परिणाम होत नाही. परंतु, त्‍याबाबतचे अज्ञान असल्‍याने महिलादेखील पुरुषांनीच नसबंदी करावी, याबाबत आग्रही राहत नाहीत, असे दिसून येते.
- डॉ. रमेश भोसले, माजी विभागप्रमुख, स्‍त्रीरोग विभाग, ससून रुग्‍णालय


गेल्‍या चार वर्षांतील पुणे, सोलापूर व सातारा येथील सरकारी व खासगी रुग्‍णालयांतील ‍महिला व पुरुष नसबंदी आकडेवारी (स्रोत ः आरोग्‍य विभाग)
वर्ष महिला नसबंदी – पुरुष नसबंदी
२०२१–२२ – ४८२७५ – १९५
२०२२–२३ – ६९६४८ – ५४८

२०२३–२४– ६०९४६ – ५०४
२०२४–२५– ५८७०६ – ५१७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com