एक स्वच्छतागृह तब्बल ८६ लाखांचे

एक स्वच्छतागृह तब्बल ८६ लाखांचे

Published on

पुणे, ता. १२ : शहराच्या प्रवेशद्वारासह पुणे स्थानक परिसरात मॉल, मल्टीप्लेक्सप्रमाणे नागरिकांना चांगले व स्वच्छ स्वच्छतागृह उपलब्ध होण्यासाठी वातानुकूलित (एसी) स्वच्छतागृह महापालिका उभारणार आहे. या प्रत्येक स्वच्छतागृहासाठी ८६ लाखांपेक्षा जास्त खर्च येणार असून, पाच स्वच्छतागृहांसाठी महापालिका तब्बल चार कोटी ३१ लाख रुपये खर्च करणार आहे. मात्र, हे स्वच्छतागृह उभारल्यानंतर ते दुर्गंधीयुक्त आणि स्वच्छ ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागांत महापालिकेची सुमारे १२०० स्वच्छतागृह आहेत. मात्र त्यात विद्युत व्यवस्था नसणे, तुटलेली भांडी, फरशा, तुंबलेली मोरी, तुटलेले नळ, फुटलेली पाइपलाइन या दुरवस्थेमुळे नागरिक सार्वजनिक स्वच्छतागृह वापरणे टाळतात. शहरातील स्वच्छतागृहे, शौचालये घाण होत असल्याने महापालिकेने पाच कोटी रुपये खर्च करून स्वच्छतेसाठी पाच परिमंडळात पाच निविदा काढल्या आहेत. त्यामध्ये जेंटिंग मशिनने पाणी मारून प्रत्येक स्वच्छतागृह दिवसातून दोन वेळा स्वच्छ करणे आवश्‍यक आहे. पण या ठेकेदारांकडून तीन-चार दिवसांतून एकदाच स्वच्छतागृह स्वच्छ केले जात आहे. तसेच ते पूर्ण स्वच्छ न करता केवळ पाण्याचा मारा करून कर्मचारी निघून जात असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत दिसून आले. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही बहुतांशी स्वच्छतागृहाच्या स्थितीत नाहीत. दुर्गंधीमुळे त्या परिसरातून ये-जा करताना नागरीकांना अक्षरशः नाका-तोंडावर रुमाल धरण्याची वेळ येते.

अजित पवार यांची सूचना
शहरात महिलांच्या स्वच्छतागृहांची कमतरता असताना त्यांच्या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष केले जात असल्याने त्यांची कुचंबणा होते. डिसेंबर महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहे उभारली पाहिजेत, तेथे चांगल्या सुविधा असाव्यात अशी सूचना केली होती. त्यानंतर महापालिकेने शहराच्या प्रवेशद्वारावर व्हीआयपी स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली होती. त्यानुसार त्याचे पूर्वगणनपत्रक तयार केले आहे.


या सुविधा असणार
१) व्हीआयपी स्वच्छतागृहात अंघोळ, कपडे बदलण्याची सुविधा
२) मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगची सुविधा आणि वायफाय
३) स्वच्छतागृह पूर्णपणे वातानुकूलित
४) मॉल, मल्टिप्लेक्समध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीने सुसज्ज स्वच्छतागृह असतात त्याच पद्धतीचे रचना
५) स्वच्छतागृह पूर्णपणे सशुल्क
६) स्वच्छतागृहाच्या देखभाल-दुरुस्तीच्या खर्चासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी जाहिरात करण्याचा ठेकेदाराला हक्का


या ठिकाणी असणार स्वच्छतागृह आणि खर्च
१) कात्रज चौक, सातारा रस्ता- ८६.११ लाख
२) पुणे-मुंबई रस्ता, बालेवाडी- ८६.२५ लाख
३) शेवाळवाडी बस डेपो, पुणे-सोलापूर रस्ता- ८६.३५ लाख
४) पुणे रेल्वे स्थानक- ८६.०८ लाख
५) वाघोली, पुणे-नगर रस्ता- ८६.४० लाख

पुणे शहराच्या प्रवेशद्वाराजवळ व पुणे स्थानक येथे सुसज्ज व अद्ययावत स्वच्छतागृहे बांधली जाणार आहे. ही स्मार्ट स्वच्छतागृहे वातानुकूलित असणार आहेत. यासाठी चार कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च येणार आहे.
- संदीप कदम,
उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका

PNE25V13272

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com