‘एनसीएसएल’ परिषदेत १३० जणांचा सहभाग

‘एनसीएसएल’ परिषदेत १३० जणांचा सहभाग

Published on

पुणे, ता. ८ ः जागतिक पातळीवर लोकशाही संवाद बळकट करण्यासाठी अमेरिकेच्या बोस्टन येथे आयोजित ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लिजिस्लेटर्स (एनसीएसएल)’ परिषदेत देशातील २४हून अधिक राज्यांच्या विधिमंडळातील १३०हून अधिक सदस्यांच्या शिष्टमंडळाने भाग घेतला.
ही परिषद सोमवार (ता. ४) ते बुधवार (ता. ६) या दरम्यान झाली. भारतीय शिष्टमंडळाने एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटच्या ‘नॅशनल लिजिस्लेटर्स कॉन्फरन्स भारत (एनएलसी)’ मंचाच्या पुढाकाराने या परिषदेत भाग घेतला. या शिष्टमंडळात २१ राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व होते, अशी माहिती एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटचे प्रमुख डॉ. सुधाकर परिमल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेत सीमापार ज्ञानविनिमय, विधिमंडळीय कार्यक्षमता वाढवणे, तसेच शासन व कायदे प्रक्रियेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्वोत्तम पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेणे, यावर भर देण्यात आला. विविध देशांतील विधिमंडळ सदस्यांशी थेट आणि उत्स्फूर्त संवादाचे सत्रही आयोजित करण्यात आले. दौऱ्यादरम्यान अमेरिकन विधिमंडळ व्यवस्थेवर आधारित शैक्षणिक सत्रे, स्थानिक संस्था व विधानसभांना भेटी, तसेच राजकारण, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील भारतीय वंशाच्या प्रमुख नेतृत्वाशी संवाद साधण्यात आला. जगातील दोन सर्वांत मोठ्या लोकशाहींमधील अर्थपूर्ण संवाद घडविणे आणि भारतीय वंशीय समुदायांशी संबंध अधिक दृढ करणे, हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश होता.

Marathi News Esakal
www.esakal.com