शहराला ‍विषाणूजन्य आजारांचा विळखा
तापासह खोकल्याची लक्षणे ः ‘एच १ एन १’ सह ‘एच ३ एन २’ च्‍या रुग्‍णसंख्‍येत वाढ

शहराला ‍विषाणूजन्य आजारांचा विळखा तापासह खोकल्याची लक्षणे ः ‘एच १ एन १’ सह ‘एच ३ एन २’ च्‍या रुग्‍णसंख्‍येत वाढ

Published on

पुणे, ता. १८ : सध्‍याच्‍या पावसाळी वातावरणामुळे सध्‍या शहरात हंगामी फ्लू असलेल्‍या विषाणूजन्‍य आजारांनी डोके वर काढले आहे. यामध्‍ये दरवर्षीप्रमाणे ‘एच १ एन १’ (स्‍वाइन फ्लू) सह ‘एच ३ एन २’ च्‍या रुग्‍णसंख्‍येत वाढ झाली आहे. मात्र, त्‍यामुळे कडकडून ताप भरत असल्‍याचे वगळता इतर लक्षणे सौम्‍य स्‍वरूपाची आहेत. त्‍यामुळे रुग्‍णालयात भरती होण्‍याचे प्रमाण मात्र वाढलेले नाही. ही लक्षणे फ्लूवीरच्‍या गोळ्या व मुलांना फ्लूवीर हे विषाणूविरोधी औषध दिल्‍यानंतर लक्षणे कमी होत असल्‍याची माहिती खासगी रुग्‍णालयातील तज्‍ज्ञ डॉक्‍टर देतात.
भारती विद्यापीठ रुग्‍णालयाचे वरिष्‍ठ नवजात व बालरोगतज्‍ज्ञ डॉ. प्रमोद सूर्यवंशी म्‍हणाले,‘‘सध्‍या फ्लूचे रुग्‍ण वाढलेले आहेत. त्‍यांच्‍या नमुन्‍यांची तपासणी केली असता, त्‍यांच्‍यामध्‍ये स्‍वाइन फ्लूच्‍या ‘एच १ एन १’ या विषाणूंचा स्‍ट्रेन आढळून येत आहे. त्‍या खालोखाल हंगामी फ्लू असलेला ‘एच ३ एन २’ या विषाणूच्‍या उपप्रकाराचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे मुलांना १०२ ते १०४ फॅरेनाइट ताप येणे, सोबत थंडी वाजून येणे, खोकला येणे ही लक्षणे दिसत आहेत. हा ताप तीन ते चार दिवस राहतो. काही मुलांमध्‍ये तापाचे झटकेदेखील येत आहेत. स्‍वाइन फ्लूवरील फ्लूवीर औषध दिल्‍यावर तो उतरतो. तसेच, लक्षणांनुसार उपचार दिले जातात. तसेच ‘आरएसव्‍ही’ ‘ॲडिनो व्‍हायरस’ या विषाणूंचेदेखील प्रमाण दिसून येत आहे. मात्र, ते तुलनेने कमी आहे. सध्‍याचे वातावरण विषाणूंसाठी पोषक असल्‍याने हे रुग्‍ण वाढलेले आहेत. अशी लक्षणे असल्‍यास डॉक्‍टरांना दाखवावे.’’
नोबल रुग्‍णालयातील संसर्गरोग तज्‍ज्ञ डॉ. अमित द्रविड म्‍हणाले, ‘‘सध्‍या सर्दी, खोकला, ताप, दम लागणे याचे रुग्‍ण वाढलेले आहेत. त्‍यांच्‍यामध्‍ये स्‍वाइन फ्लूची लक्षणे आढळून येत आहेत. तसेच, न्यूमोनिया झाल्‍याने रुग्‍णालयात भरती करून उपचार द्यावे लागतात. सोबत टायफाइड, पोटदुखी, जुलाब याचेही रुग्‍ण वाढलेले आहेत. हा प्रामुख्‍याने फ्लूचा सीझन असून, त्‍यामध्‍ये हे विषाणूजन्‍य आजार वाढलेले दिसतात. गेल्‍या वर्षीही हे रुग्‍ण वाढलेले होते. त्‍यांना फ्लूवीर दिल्‍यावर बरे वाटते. खासकरून ज्येष्ठांना दम लागत असल्‍याचेही दिसून येत आहे.’’
दरम्‍यान, विषाणूजन्‍य आजारांचे प्रमाण वाढले असले तरी हे रुग्‍ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेऊन बरे होत आहेत. त्‍यांना रुग्‍णालयात भरती करावे लागत नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्‍णालयातील अतिदक्षता विभागतज्‍ज्ञ डॉ. प्रसाद राजहंस म्‍हणाले, ‘‘स्‍वाइन फ्लू किंवा ‘एच १ एन १’चे रुग्‍ण भरती झालेले नसून, त्‍यांच्‍यामध्‍ये वाढही झालेली नाही. तसेच वेगळाही विषाणू दिसून येत नाही.’’
..............
कारणे काय?
– हंगामी फ्लूचे वाढलेले प्रमाण, हवामानातील बदल
–विषाणूंच्‍या वाढीसाठी पोषक असलेले वातावरण
– एकमेकांच्‍या संपर्कात आल्‍याने होणारा संसर्ग
– शाळांमध्‍ये आजारी मुलांपासून दुसऱ्यांना संसर्ग
............
काय काळजी घ्याल?
– सर्दी, ताप, खोकला असल्‍यास डॉक्‍टरांना दाखवा
– ज्‍येष्‍ठ नागरिकांनी स्‍वाइन फ्लूची लस घ्यावी
– गर्दीत जाताना मास्‍क वापरा
– पावसात मुलांनी किंवा मोठ्यांनी भिजू नये
– प्रोटीनयुक्‍त आहार जास्‍त प्रमाणात घ्या
...............
यावर्षी आढळलेले ‘एच १ एन १’ चे रुग्‍ण
जानेवारी ः ४
फेब्रुवारी ः २
मार्च ः ७
एप्रिल ः ३
मे ः ५
जून ः ४
जुलै ः १६
एकूण ः ४१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com