राज्यात अनेक धरणे शंभर टक्के भरली

राज्यात अनेक धरणे शंभर टक्के भरली

Published on

पुणे, ता.१८ : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्‍या पावसाने शनिवारपासून पुन्हा जोर धरला असून, प्रामुख्याने घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली. कोकणात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे, तर ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे.
राज्यात मागील काही दिवस पावसाने काहीशी उघडीप दिली होती. आता मात्र संपूर्ण राज्‍यात तो सक्रिय झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. प्रामुख्याने मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे धरणात वेगाने आवक वाढत असून अनेक भरली असल्याने धरणातून पुन्हा विसर्गात वाढ करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असल्याने धरणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणांपैकी पाच धरणांतून विसर्ग केला जात आहे. कोल्हापूरच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच धरणांमधून अतिरिक्त पाणी सोडले जात आहे.
सिंधुदुर्गात सुरू असलेल्या संततधारेने जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. सर्वत्र मुसळधार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मुसळधार सुरूच असल्याने गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. राधानगरी धरणाचे सर्वच्या सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडले असून, त्यातून भोगावती नदीपात्रात ११ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मराठवाड्यात पाऊस सलग चौथ्या दिवशीही सुरूच आहे. सहा जिल्ह्यांतील तब्बल ३८ मंडळांत अतिवृष्टी झाली. त्या भागांतील नदी-नाले एक होऊन पीक पाण्याखाली गेली आहेत.
विदर्भातील अनेक भागांत संततधार पाऊस झाला आहे. प्रामुख्याने यात अकोला भागात मेहकर, मालेगाव, लातूर, बाळापूर आदी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला आहे. मेहकर तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उतावळी, निर्गुणासारखे प्रकल्प तुडुंब भरल्याने त्यातील पाणी नदीपात्रात ओसंडून वाहत आहे.

महाराष्ट्र व शेजारच्या राज्यांमध्ये मॉन्सून जोरदार सक्रिय झाला आहे. महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, त्‍याचबरोबर रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तसेच पुणे, सातारा व कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पुढील ७२ तासांसाठी रेड व ऑरेंज अलर्ट आहे. त्या भागांना भेट देताना काळजी घ्या. मुंबईत ऑरेंज अलर्ट आहे, पुढील ४८ तासांत रेड अलर्टही लागू होऊ शकतो. पुणे शहरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहून हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
- अनुपम कश्‍यपी, माजी प्रमुख, हवामानशास्‍त्र विभाग, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com