पुण्यातील स्थिती समन्वयामुळे नियंत्रणात
पुणे, ता. १९ ः पुणे महापालिकेने नदीपात्रातील, नाल्यांमधील काढलेले अतिक्रमण, पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित केलेली कामे यामुळे शहरात मुसळधार पाऊस होऊनही कोणत्याही रस्त्यावर पाणी तुंबलेली नाही, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. पाटबंधारे विभाग आणि महापालिकेमध्ये समन्वय आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन खडकवासला धरणात कमी पाणीसाठा ठेवल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस होऊनही मुठा नदीला मोठा पूर आलेला नाही, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
पुणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनाच्या संदर्भात महापालिकेत आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘‘
मागच्या दोन-तीन दिवसांपासून पुणे शहरासह ग्रामीण भागांत पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस पडत आहे. पण पाटबंधारे विभागाने पाणी साठ्याचे नियोजन व्यवस्थित केले आहे. खडकवासला धरण ५० टक्के रिकामे ठेवण्यात आले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस पडला, अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे, तरीही पूरस्थिती निर्माण झालेली नाही. पुणे, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात धोकादायक स्थिती निर्माण झालेली नाही. उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थिती नियंत्रणात राहील.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
महापालिकेने पावसाळ्यापूर्वीची कामे व्यवस्थित पार पाडली आहेत. त्यामुळे आज दिवसभरात तुरळक ठिकाणी वगळता उर्वरित शहरात रस्त्यावर पाणी तुंबून वाहतुकीचा खोळंबा झालेला नाही. तसेच नदी पात्र, नाल्यावरील अतिक्रमण काढले आहे, २२८ धोकादायक ठिकाणांपैकी ५० टक्के ठिकाणी कायमची उपाययोजना केल्याने पाणी तुंबलेले नाही. एकता नगरी, पाटील इस्टेट, खिलारी वस्ती येथे पाणी घुसलेले नाही. जर पाणी घुसले तर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची तयारी पूर्ण झालेली आहे.
- नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका
१६ ठिकाणी तुंबले पाणी
पुणे शहरात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने १६ ठिकाणी पाणी तुंबल्याच्या तक्रारी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आल्या. यामध्ये यश टॉवर वानवडी, विघ्नहर्ता नगर, कात्रज कोंढवा रस्ता, हॅरिस पूल, न. ता. वाडी, तोफखाना चौक, सेव्हल लव्हज् चौक, भुसारी कॉलनी, चांदणी चौक, ग्रीन पार्क सोसायटी पॅनकार्ड क्लब रस्ता, वारजे, कर्वेनगर या भागातून पाणी तुंबल्याच्या तक्रारी आल्या होत्या, पण तेथील पाण्याचा निचरा लगेच करण्यात आला. कोणतेही नुकसान झालेले नाही, असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनूने यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.