शिक्षणक्षेत्रातील वैभव ः नामदार गोपाळ कृष्ण गोखले
------------------
भारत सेवक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या १९ फेब्रुवारी २०२५ रोजी ११० व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयात ज्येष्ठ पत्रकार डॉ. एस. के. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता अभिवादन करण्यात येत आहे. त्यानिमित्त...
- जयराम देसाई
----------------------
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे शिष्य आणि महात्मा गांधी यांचे गुरू नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे महाराष्ट्राच्या शिक्षणातील एक वैभव होते. पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून ते शिकवायला लागले. प्रथमपासून ते काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. अखिल भारतीय काँग्रेसचे ते पुढे अध्यक्ष झाले. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ते संसदीय सदस्य होते. गोखले हे मवाळ पक्षाचे तर टिळक हे जहाल पक्षाचे (विचाराचे) होते. जात- पात- धर्म विरहित समाज निर्मितीचे ते भोक्ते होते. त्यांचा जन्म ९ मे १८६६ आणि मृत्यू १९ फेब्रुवारी १९१५ मध्ये झाला.
गोखले कुळाचे वसतिस्थान कोकणात वेळणेश्वर. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले. लहानपणापासूनच त्यांचे विलक्षण पाठांतर होते. गणित हा त्यांचा आवडता विषय होता. त्यांची स्मरणशक्ती अफाट होती. देशप्रेमाने लहानपणापासून प्रेरित होते. महात्मा गांधी त्यांना आपले गुरू मानीत. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा त्यांचा अभ्यास होता. रानड्यांच्या सांगण्यावरून ते आगरकरांच्या ‘सुधारक’चे सहसंपादक झाले. हिंदुस्थानच्या जमाखर्चाची तपासणी करण्यासाठी ब्रिटनमध्ये लॉर्ड बेल्बी कमिशन नेमले होते. त्या वेळी वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी ते इंग्लंडला गेले होते. साक्ष देण्यासाठी त्यांचा दौरा होता. १८९९ मध्ये मुंबईच्या कायदे मंडळात, तर १९०२ मध्ये कायदे कौन्सिलवर ते निवडून आले. १९०५ मध्ये त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. वयाच्या ३९ व्या वर्षी बनारस येथे भरलेल्या अधिवेशनात ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. गांधीजींच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत त्यांना मदत करण्यासाठी गेले होते.
गोखलेंची वैचारिक जडणघडण फार मोठी होती. फर्ग्युसन महाविद्यालयात ते इंग्रजीचे प्राध्यापक आणि आगरकरांच्या ‘सुधारक’ पत्रात इंग्रजी विभागाचे ते संपादक होते. सामाजिक सुधारणा व राजकीय सुधारणा या दोन्ही आघाडीवर काम करताना त्यांची भूमिका मवाळ राहिली होती. महात्मा गांधींनी त्यांना मार्गदर्शन करताना कान, डोळे उघडे ठेवून भारतभर फिरण्याची सूचना केली होती. टिळक हिमालयाप्रमाणे, फिरोजशहा महासागराप्रमाणे तर गोखले गंगेप्रमाणे वाटले असे त्यांनी म्हटले होते.
‘भारत सेवक’ आणि ‘नेकदार’ या उपाध्या त्यांना मिळाल्या होत्या. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमागे त्यांना प्रेरणा न्यायमूर्ती रानडे यांची होती. त्यांचा अभ्यास व व्यासंग मोठा होता. गोखल्यांच्या ध्येयवादी, सत्त्व आणि बुद्धिवादी व्यक्तिमत्त्वामुळे महात्मा गांधी व बॅ. जीना हे दोघेही त्यांना गुरुस्थानी मानत होते. राष्ट्राचा सर्वांगीण विकास हे त्यांचे उद्दिष्ट होते. शिक्षणाचा प्रसार, स्त्रिया आणि दलित वर्गात करणे हा त्यांचा विचार होता.
पुणे ही भारताची वैचारिक राजधानी म्हणून पूर्वीपासून सुरू झालेला हा वैचारिक काळ पुढे फुले, रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गोखले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, राजर्षी शाहू महाराज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत विस्तारत, विकसित होत उत्कर्षाला गेला. सर्व तऱ्हेच्या परस्पर विरोधी विचारसरणीमधल्या तीन तीव्र कलहाच्या त्या काळात निर्माण झालेल्या ऊर्जेने महाराष्ट्र सातत्याने देशाच्या केंद्रस्थानी राहिला. दादाभाई नौरोजी, रानडे, टिळक, गोखले हे त्यामध्ये अग्रभागी होते. कारण या मंडळींचे चारित्र्य व चरित्र समाजापुढे एक आदर्श होते. त्यांच्या या स्मृती समाजापुढे कायम राहाव्यात अशी ज्येष्ठ सहकार व सामाजिक आणि स्वातंत्र्यसैनिक नरुभाऊ लिमये यांची प्रेरणा होती. देशाच्या या थोर देशभक्त नामदार गोखले यांना अभिवादन!
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.