पाणी टंचाईमुक्तीसाठी गरज ६७ टाक्यांची

पाणी टंचाईमुक्तीसाठी गरज ६७ टाक्यांची
Published on

पुणे, ता. २४ ः पाणी टंचाईमुळे कायम तहानलेल्या भागांत नागरिकांचा रोष प्रशासनाला सहन करावा लागत होता. मात्र, समान पाणीपुरवठा योजनेतून गेल्या वर्षभरात महापालिकेने १५ टाक्यांचे काम पूर्ण करून त्यातून जलवितरण सुरू केले. त्यामुळे टँकरची संख्या कमी झालीच, पण पुरेसे पाणी मिळत असल्याने तक्रारी कमी झाल्याचा दावा प्रशासन करत आहे. यामध्ये बोपोडी, आशानगर-गोखलेनगर, विमाननगर, धायरी, धानोरी, पंचवटी आदी भागांचा समावेश आहे. संपूर्ण शहर टंचाईमुक्त होण्यासाठी अजून ५२ टाक्यांचे काम पूर्ण होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी मे २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
शहरातील असमान पाणीपुरवठा होणाऱ्या यंत्रणेत बदल करून सर्व भागांत समान व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी २०१७ मध्ये एक हजार ९७३ कोटी रुपयांच्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले. यासाठी शहराची पाच पॅकेजमध्ये विभागणी करून प्रत्येक कामाची निविदा काढण्यात आली आहे. यापैकी पॅकेज एक, दोन, तीन आणि पाचमध्ये एल ॲण्ड टी कंपनीकडून काम सुरू आहे. हे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे; तर पॅकेज चारचे काम हे जैन इरिगेशन या कंपनीकडून सुरू असून, त्यांचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. या योजनेअंतर्गत ८२ टाक्या बांधल्या जाणार असून, त्याच्या स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत. ही सर्व कामे मे २०२६ पर्यंत पूर्ण होतील, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे.

अशी आहे स्थिती
- पूर्वीच्या पाणीपुरवठा यंत्रणेमध्ये टाक्यांची संख्या कमी होती
- एकाच टाकीवरून अनेक किलोमीटर लांबवरच्या भागाला पाणीपुरवठा होत होता
- त्यामुळे टाकीच्या जवळच्या भागाला २४ तास पाणी पुरवठा होत होता
- टाकीपासून लांब असलेल्या शेवटच्या भागात पाणी कमी पोचत असल्याने तेथे कायम पाणी टंचाई भासत होती
- दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवला तर अशा शेवटच्या भागात (टेलएंड) तीन-चार दिवस पाणी मिळत नाही अशी अवस्था आहे
- ही परिस्थिती आजही अनेक भागांत असून, सर्व टाक्या कार्यान्वित झाल्याशिवाय ही समस्या संपणार नाही

टाक्यांमुळे झाला असा फायदा
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत संपूर्ण शहरात सुमारे १२०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. जलशुद्धीकरण केंद्रातून जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला शहरात ठिकठिकाणी उपजलवाहिन्या जोडून त्याद्वारे विविध भागांत पाणी पोचविण्यात येणार आहे. तेथे प्रत्येक ठिकाणी व्हॉल्व्ह जोडण्यात आल्याने किती पाणी आले, किती पाणी गेले याची नोंद पाणी पुरवठा विभागाकडे होत आहे. हे पाणी साठवून ठेवण्यासाठी मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये १५ लाख लिटर ते ३५ लाख लिटरपर्यंत क्षमतेच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. ८२ टाक्यांपैकी आत्तापर्यंत ३० टाक्या बांधून पूर्ण होऊन, त्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टाक्यांची संख्या वाढल्याने पूर्वी ज्या भागांत पाणी पोचत नव्हते, तेथे आता वेळेत पाणी जात आहे. गळतीचे प्रमाण कमी झाले आहे.

वर्षभरात १५ टाक्या कार्यान्वित
पाणीपुरवठा विभागाने गेल्या वर्षभरात १५ पाण्याच्या टाक्या कार्यान्वित केल्या आहेत. आशानगर-गोखलेनगर येथील पाण्याची टाकी सुरू करण्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये मोठा वाद झाला होता. विशेष म्हणजे उद्‍घाटनानंतर जवळपास एका वर्षाने ही पाण्याची टाकी पूर्णपणे कार्यान्वित झाली आहे. त्याचप्रमाणे खराडी येथील टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील महापालिका व खासगी टँकरच्या सुमारे ११० फेऱ्या कमी झाल्या आहेत. चिखलवाडी, बोपोडी येथील टाकीचे काम पूर्ण केल्याने विधातेवस्ती येथील पाणीटंचाई कमी झाली आहे. त्याचप्रमाणे धायरी हायब्लिस सोसायटी, पुणे विद्यापीठ भोसलेनगर टाकी, विमाननगर टाकी, हरणतळ टाकी, बी. यू. भंडारी धानोरी टाकी, सिंहगड रस्ता रोहन कृत्तिका टाकी, परुळेकर शाळा, पंचवटी, सोमनाथनगर, कल्याणीनगर या टाक्यांचे काम पूर्ण झाल्याने त्याअंतर्गत पाणीपुरवठा होणाऱ्या भागांतील नागरिकांना बसणारी पाणी टंचाईची झळ काही प्रमाणात कमी झाली आहे.

एकूण ८२ पैकी ६७ टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी ३० टाक्यांमधून पाणीपुरवठा सुरू झाला असून, गेल्या वर्षभरात महापालिकेने १५ टाक्यांमधून पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे या भागांतील पाणी टंचाईच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. उर्वरित टाक्यांचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख पाणीपुरवठा

टाकीचे नावे - पाणी साठवणूक क्षमता (‘एमएलडी’मध्ये)
चिखलवाडी बोपोडी - ३
नानासाहेब परुळेकर शाळा -३
पुणे विद्यापीठ टाकी - ६
आशानगर गोखलेनगर -१.५
हायब्लिस सोसायटी धायरी - ३.५
विमाननगर (दोन) - ९
खराडी -३.५
हरणतळ - २
धानोरी - २
रोहन कृत्तिका (दोन) - ७
सोमनाथनगर (दोन) - ६.५
पंचवटी - २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com