थकीत ‘एफआरपी’ आठ दिवसांत द्या

थकीत ‘एफआरपी’ आठ दिवसांत द्या

Published on

पुणे, ता. २५ ः ‘रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) थकीत रक्कम जवळपास सात हजार कोटी रुपये आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आठ दिवसांत ‘एफआरपी’ देण्यात यावी. अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन साखर आयुक्तालयात येऊ आणि सर्व रक्कम व्याजासह वसूल करूनच जाऊ,’ असा इशारा शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. २५) दिला.
शेट्टी यांनी पुण्यात साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांना याबाबत निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, ॲड. योगेश पांडे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर आदी उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, ‘‘एफआरपी एकरकमी द्यावी असा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. एफआरपी टप्प्याटप्प्‍याने देण्याचा राज्य शासनाचा निर्णय रद्द झाला. अनेक साखर कारखान्यांनी डिसेंबरनंतर शेतकऱ्यांचे पैसेच दिलेलेच नाहीत. शेतकरी हेलपाटे मारत आहेत. त्यांना विलंब आकारानुसार व्याज मिळाले पाहिजे. साखर आयुक्तांना भेटल्यानंतर कळले की थकबाकी दोन हजार ३०० कोटी आहे, परंतु ही अर्धवट माहिती आहे. शेतकऱ्यांची जवळपास सात हजार कोटींची थकबाकी राहिली आहे. साखर आयुक्तांच्या निर्णयाची आठ दिवस वाट बघणार आहोत.’’
‘अनेक कारखान्यांनी २०१९ पासून महसूल विभागणी उत्पन्नाचा (आरएसएफ) हिशेब दिलेला नाही. कारखाने पाच वर्षे हिशेब देत नसतील तर याठिकाणी बसणारे अधिकारी काय करत आहेत? त्यांच्याकडून हिशेब का घेतला नाही ? शेतकऱ्यांचे पैसे इतके दिवस वापरण्याची परवानगी त्यांना का दिली? ऊस दर नियंत्रण समिती होऊन १५ महिने उलटले, पण बैठकही झालेली नाही. शेतकऱ्यांना कशी वागणूक मिळत आहे ते यातून दिसते,’ असेही शेट्टी यांनी नमूद केले.
‘आज ज्वलंत प्रश्नांकडे पाहिले जात नाही. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ मिळत नाही. सोयाबीन खरेदी केले जात नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दंगली घडत आहेत. महिला सुरक्षित नाहीत. नागरिकांचे हे प्रश्न आहेत. परंतु त्यांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी संवदेनशील विषय काढायचा. त्यातून लोकांची माथी भडकवायची आणि आपले अपयश लपवायचे हेच यामागील कारण आहे,’ असेही शेट्टी म्हणाले.
---

कोरटकर चिल्लर माणूस असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात. हा चिल्लर माणूस एक महिना का सापडत नव्हता? अशी माणसे वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी पेरली गेली आहेत.
- राजू शेट्टी, संस्थापक, शेतकरी संघटना
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com