अग्निशामक दलाच्या केंद्रांची वानवा
पांडुरंग सरोदे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १७ : महापालिकेमध्ये आतापर्यंत ३२ गावे समाविष्ट झाली, संबंधित गावांना रस्ते, पाणी, वीज यांसारख्या सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यातच संबंधित गावांमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास किंवा पावसाळ्यात झाडपडी, पाणी शिरण्यासारख्या घटना घडल्यास मदतीला तत्काळ धावून जाण्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक केंद्रांची अजूनही वानवा आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीवरील किंवा पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशामक केंद्रांवरच समाविष्ट गावांना अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
सूस, म्हाळुंगे, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे, नांदेड, नऱ्हे, आंबेगाव, खडकवासला, नांदोशी, किरकटवाडी या गावांमध्ये औद्योगिक वसाहती, आयटी कंपन्या, छोटे-मोठे कारखाने, उद्योग-व्यवसाय आहेत. याबरोबरच तेथे दाट लोकवस्ती व उंच इमारतीही आहेत. मांजरी, साडेसतरानळी, केशवनगर, फुरसुंगी, होळकरवाडी, शेवाळवाडी, औताडेवाडी, वडाचीवाडी, उंड्री-पिसोळी यांसारख्या गावांमध्ये कपडे, फर्निचरची गोदामे, मॉल, फायबरच्या वस्तू बनविणाऱ्या कंपन्या, हॉटेल्स आहेत. याबरोबरच नामांकित शैक्षणिक संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, उद्योग-व्यवसायांची संख्या वाढत आहे. असे असूनही तेथे अग्निशामक दलाचे केंद्र उभारले नाहीत.
काय आहेत अडचणी?
१) महापालिकेत समाविष्ट गावांमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास, मुसळधार पाऊस किंवा पुरस्थितीच्या वेळी नजीकचे महापालिका किंवा पीएमआरडीएच्या अग्निशामक केंद्रांची मदत घ्यावी लागते.
२) अरुंद रस्ते, अतिक्रमणे व दाट लोकवस्तीत घटनास्थळी पोचण्यास अग्निशामक दलाच्या वाहनांचा बराच वेळ जातो. त्यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३) पीएमआरडीए किंवा खासगी अग्निशामक दलांच्या केंद्रांकडून अनेकदा मदत घ्यावी लागते. मात्र त्यांच्याकडेही मर्यादित यांत्रिक मदत व मनुष्यबळाची कमतरता असते. त्यामुळे त्याचाही फार उपयोग होत नाही.
२१
- महापालिका अग्निशमन केंद्र
०३
- पीएमआरडीए अग्निशमन केंद्र
समाविष्ट गावांमध्ये आगीची घटना घडल्यास पुणे महापालिकेच्या जवळच्या अग्निशमन केंद्राकडून तत्काळ सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न केला जातो. तसेच पीएमआरडीएचीही मदत घेतली जाते.
- देवेंद्र पोटफोडे,
प्रमुख, अग्निशामक दल, पुणे महापालिका
पिण्याचे स्वच्छ पाणी, कचरा, पथदिवे, सांडपाणी वाहिन्या यांसारखे महत्त्वाचे प्रश्न महापालिका सोडवत नाही. मग अग्निशामक दलाच्या केंद्राचा प्रश्न केव्हा सोडविणार? वाढते उद्योग, व्यवसायक, औद्योगिक क्षेत्रामुळे अग्निशामक दलाच्या केंद्रांची आवश्यकता आहे. मात्र त्याकडे लक्ष द्यायला महापालिकेला वेळ आहे का?
- किसन वाघमारे,
रहिवासी, उत्तमनगर
तुमचे मत मांडा...
महापालिकेमध्ये गावे समाविष्ट होऊनही तेथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आता पावसाळा सुरू झाल्याने अग्निशामक दलाची गरज पडणार आहे. याबाबत तुमचे मत मांडा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.