सर्व रुग्‍ण उपचारांनी बरे; एकही मृत्‍यू नाही

सर्व रुग्‍ण उपचारांनी बरे; एकही मृत्‍यू नाही
Published on

पुणे, ता. ७ : मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा विषाणू जुनाच आहे. त्‍याची लक्षणेही सौम्‍य म्‍हणजे सर्दी खोकल्‍यासारखी आहेत. या विषाणमुळे श्‍वसनमार्गाच्‍या वरच्‍या भागात संसर्ग होतो. तो खालच्‍या बाजूला उतरून न्यूमोनिया होत नाही. गेल्‍यावर्षी या विषाणुंचे राज्‍यात जवळपास १७२ रुग्‍ण वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्‍ये आढळून आले होते, परंतु ते सर्व उपचारांनी बरे झाले असून, एकही मृत्‍यू झालेला नाही. त्‍यामुळे त्‍याची काळजी करण्‍याचे कारण नाही, अशी दिलासादायक माहिती राज्‍याचे माजी सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

डॉ. आवटे म्‍हणाले की, हा विषाणू सौम्‍य प्रकारचा असून, पाच वर्षांखालची मुले व ६५ वर्षांवरील ज्‍येष्ठ व ज्‍यांची प्रतिकारशक्‍ती कमी आहे त्‍यांच्‍यामध्‍ये हा क्‍वचित गंभीर स्‍वरूप धारण करू शकतो, परंतु त्‍याची शक्‍यता अतिशय दुर्मिळ आहे. याबाबतचा व्हिडिओ त्‍यांनी समाजमाध्‍यमावरही टाकला आहे.
..........
ससूनमध्‍ये आढळले होते १२ रुग्‍ण
ससून रुग्णालयात मागील दोन वर्षांमध्ये या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, परंतु २०२२ मध्ये विषाणूचा संसर्ग झालेले १२ रुग्ण आढळून आले होते. यामध्ये ७ लहान मुले आणि ५ प्रौढांचा समावेश होता. ते सर्व उपचारांनी बरे झाले. विषाणूची लागण झाल्यावर फ्लूसद़ृश लक्षणे दिसतात. फुप्फुसाला तीव्र संसर्ग झाल्यास क्‍वचित एखाद्या रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासू शकते. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. आवश्यक ती स्वच्छतेविषयी काळजी घ्यायला हवी, असे आवाहन ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार आणि जनऔषध विभागाचे प्रमुख डॉ. रोहिदास बोरसे यांनी केले आहे.

.........
हिवाळ्याच्या किंवा उन्हाळ्याच्या सुरवातीला जे सर्दी-खोकल्‍याचे प्रमाण वाढते त्‍याच्‍याकरता जे जबाबदार विषाणू असतात त्‍या गटातील हा एक विषाणू आहे. त्‍यामुळे जो संसर्ग होतो तो श्‍वसनमार्गाच्‍या वरच्‍या बाजूला होतो. हा आजार होऊ नये यासाठी लसीचीही आवश्यकता नाही, तसेच अगदी मिठाच्‍या पाण्‍याच्‍या गुळण्‍या करून, वाफ घेऊनही तो बरा होऊ शकतो, म्‍हणून नागरिकांनी याबाबत काळजी करू नये.
-डॉ. प्रदीप आवटे, माजी सर्वेक्षण अधिकारी, आरोग्‍य विभाग
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com