‘वैकुंठ’च्या खांद्यावर वाढला भार
पुणे, ता. १८ ः अस्वच्छता, पाणीटंचाईच्या समस्यांनी वैकुंठ स्मशानभूमी ग्रासलेली आहेच. पण त्यासोबतच दररोज २० पेक्षा जास्त अन् महिन्याला ७०० पेक्षा जास्त अंत्यविधी येथे होत असल्याने यंत्रणेवर ताणही येत आहे. याउलट शहरातील उर्वरित २६ स्मशानभूमींची स्थिती असून, तेथे महिन्याला मिळून १ हजार अंत्यविधी होत आहेत. तसेच उपनगरांमध्ये सुविधा असली तरी मृताचे नातेवाईक वैकुंठातच अंत्यविधीला प्राधान्य देत आहेत.
पुणे शहराची हद्द वाढत असताना प्रशासनाने गेल्या काही वर्षांत स्मशानभूमींची संख्या वाढवली आहे. काही ठिकाणी लाकडावर अंत्यविधी करण्यासह विद्युतदाहिनी, गॅसदाहिन्यांचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परिसरातील नागरिकांना धुराचा कमी त्रास व्हावा, यासाठी धूर नियंत्रण यंत्रणाही प्रत्येक शेडमध्ये बसविण्यात आली आहे. शहरात येरवडा, विश्रांतवाडी, कोरेगाव पार्क, वडगाव शेरी, खराडी, तुलसीराम बर्निंग घाट, कैलास, वाघोली, संगमवाडी, कोथरूड, बोपोडी, औंध, पाषाण, सुतारवाडी, बाणेर, बावधन, वडगाव-धायरी, धनकवडी, कात्रज, आंबेगाव, हडपसर, वानवडी, मुंढवा, कोंढवा खुर्द, गंगानगर हडपसर, वैकुंठ आणि बिबवेवाडी या ठिकाणी स्मशानभूमी आहेत. मात्र शहराच्या कात्रज, धनकवडी, आंबेगाव, धायरी, वारजे, कोथरूड, बावधन, बालेवाडी, बाणेर या दक्षिण आणि पश्चिम भागातील मृताचे नातेवाईक तेथील स्मशानभूमीचा वापर कमी करतात, त्याऐवजी ते वैकुंठ स्मशानभूमीला प्राधान्य देत आहेत. वैकुंठ स्मशानभूमीत जास्त सुविधा आहेत, असे नातेवाईकांकडून सांगितले जात असले तरी प्रशासनाकडून ज्या सुविधा वैकुंठात आहेत, त्या अन्य ठिकाणीही आहेत, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
प्रतीक्षा वाढली
शहरातील मध्यवर्ती पेठा व अन्य भागातील मृताच्या नातेवाइकांना अंत्यविधीसाठी वैकुंठ स्मशानभूमी जवळ आहे. पण येथे रोज २० पेक्षा जास्त अंत्यविधी होत आहेत, त्यामुळे विद्युतदाहिनी असो किंवा लाकडावर अंत्यविधी करताना या भागातील नागरिकांना अनेक तास वाट पाहावी लागते.
शनिवारी स्थिती गंभीर
शुक्रवारी अंत्यविधी केल्यानंतर शनिवारी राख सावडण्यासाठी न येण्याची प्रथा आहे. वैकुंठात लाकडावर अंत्यविधी केल्यानंतर तेथील राख रविवारी सावडली जाते. त्यामुळे शनिवारी वैकुंठात अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाइकांना जागा मिळत नसल्याची स्थिती आहे. शेवटी काही जण ऐनवेळी विद्युतदाहिनी किंवा गॅसदाहिनीमध्ये अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे तेथेही गर्दी वाढते.
शहरात सर्वांत जास्त अंत्यविधी हे वैकुंठ स्मशानभूमीत होतात. उपनगरांमधूनही मृताचे नातेवाईक येथे येत असल्याने यंत्रणेवर ताण निर्माण येतो. उपनगरांत तेथील स्मशानभूमीत सुविधा उपलब्ध आहेत, नागरिकांनी तेथे प्राधान्य द्यावे.
- मनीषा शेकटकर, मुख्य अभियंता, विद्युत विभाग
वैकुंठ स्मशानभूमीत गर्दी होत आहेच; पण या ठिकाणच्या ठेकेदारावर व त्यांच्या कर्मचाऱ्यांवर महापालिकेचा वचक राहिलेला नाही. ते उद्धटपणे वागतात, चांगली सेवा देत नाहीत, असा अनुभव अनेकदा येत आहे. प्रशासनाने या स्मशानभूमीकडे लक्ष देऊन किमान आयुष्याचा शेवट तरी व्यवस्थित होऊ द्यावा यासाठी काम करावे.
- परेश खांडके, सामाजिक कार्यकर्ते
अंत्यविधीची आकडेवारी
महिना- इतर २६ स्मशानभूमी-वैकुंठ स्मशानभूमी
मार्च-९०३-७३१
एप्रिल -९५२-७६०
मे- ८९७-७१४
जून -८५८-६१३
जुलै -१३७०- ७८८
ऑगस्ट - १२१८- ९४६
सप्टेंबर - ११९८- ७९६
ऑक्टोबर - १०२८- ८२९
नोव्हेंबर - १०३२- ७५०
डिसेंबर - १०९९- ८०५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.