अवती भवती
आदिवासी जीवनशैली
प्रदर्शन आजपर्यंत
पुणे, ता. १८ : वारली आणि गोंड चित्रातून उलगडणारी आदिवासी जीवनशैली, आदिवासी हस्तकलेच्या ढोकरा शिल्प आणि नागा दागिन्यातून झळकणारा पारंपरिक साज, कपड्यांवरील नक्षीदार वीण आणि बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंमधील कोरीव हस्तकला, वनस्पतींपासून तयार केलेले औषधी पदार्थ अशा विविध गोष्टींतून आदिवासी जीवनशैलीशी जोडणारे प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली.
युनिव्हर्सल ट्रायब्स्, अलर्ट आणि आर्ट फाउंडेशनच्यावतीने ‘युनिव्हर्सल ट्रायब्स् बिग ग्रीन फेस्ट-२०२५’चे आयोजन घोले रस्ता येथील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण आणि डॉ. रमेश रघतवान यांच्या हस्ते झाले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, गणेश शिंदे, संस्थेचे संस्थापक रजत रघतवान आदी उपस्थित होते. प्रदर्शनात आसाम बांबूपासून तयार केलेली विविध भांडी, शोभेच्या वस्तू, ढोकरा शिल्पातील विविध वस्तू, नागा पद्धतीचे दागिने, विविध हर्बल उत्पादने, वारली आणि गोंड चित्रातून दाखविलेली आदिवासी जीवनशैली प्रदर्शनात दाखविण्यात आली. हे प्रदर्शन १९ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ७ या वेळेत खुले आहे.
..........
‘रामदास स्वामींचे भाषणशास्त्र’
पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ता. १८ : श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगडतर्फे डहाणूकर कॉलनीतील श्री रामचंद्र मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. सी. एम. जोशी लिखित ‘श्री समर्थ रामदास स्वामींचे भाषणशास्त्र’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुस्तकाचे प्रकाशन लोहगाव येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ई. बी. खेडकर यांच्या हस्ते झाले. या वेळी अभिराम स्वामी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास संस्थानच्या विश्र्वस्त डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर यांनी केले. हे पुस्तक समर्थ रामदासांच्या साहित्यातून भाषणकलेचा अभ्यास करताना डॉ. जोशी यांनी लिहिले. हे पुस्तक समर्थ रामदासांच्या साहित्यामधून भाषणकलेच्या महत्त्वाच्या पैलूंची चर्चा करते. दासबोध आणि मनाचे श्लोक या ग्रंथांतील श्रोता, वक्ता आणि सभाशास्त्राशी संबंधित ओव्या आणि श्लोकांचा आधार घेत, लेखकाने समर्थांच्या विचारांची विश्लेषणात्मक मांडणी केली आहे, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.
......
सामूहिक वाचनाचा
कार्यक्रम उत्साहात
पुणे, ता. १८ : सोमवार पेठेतील श्री संत गाडगे महाराज ग्रंथालय आणि मोफत वाचनालयातर्फे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत श्री संत गाडगे महाराज आकुल धर्मशाळेच्या पटांगण येथे ग्रंथप्रदर्शन व सामूहिक वाचनाचा कार्यक्रम झाला. या वेळी प्रमुख विश्वस्त अशोक चांदगुडे, के. एन. बोरा आणि संस्थेचे, ग्रंथालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

