मीना जोशी

मीना जोशी

Published on

सुमधुर गायकीचा सुसंस्कृत ठसा
सवाई गंधर्व महोत्सव ते परदेशातील स्टेज शोपर्यंत भावगीत, नाट्यगीताची मैफल ते ऑर्केस्ट्राच्या फिल्मी गाण्याच्या कार्यक्रमापर्यंत, स्वतःचे अल्बम, पार्श्‍वगायन अशा आपल्या सुमधुर गायकीचा सुसंस्कृत ठसा उमटवला त्या गायिका मीना जयंत जोशी २७ मे रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त काही आठवणी
- सुलभा तेरणीकर
-----
पुण्याच्या स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात १९६६च्या जून महिन्यात मीना भेटली. मीना हसबनीस, धारवाडची एवढं कळलं आणि ती छान गाते असं कळलं. आजच्या घडीला तिचा संगीतमय जीवनप्रवास पाहता नवल वाटते, की तिनं इतक्या माध्यमातून काम केलं, गायली. पण विशुद्ध भारतीय शास्त्रीय संगीताची निष्ठा अचल राहिली. तिनं जपलेल्या जीवनमूल्यांइतकी ती दृढ आहे आणि विलक्षण सुरेलही आहे.
धारवाडला वयाच्या पाचव्या वर्षीच किराणा घराण्याचे गायक रंगनाथ जोशी यांच्याकडे गायनाचे धडे घ्यायला सुरवात झाली. कथक नृत्याचेही शिक्षण सुरू झालं, पण मीनाची गाण्याची प्रचंड आवड पाहून तिच्या आईनं पुण्यात येण्याचा निर्णय घेतला. रसिकाग्रणी आबासाहेब मुजुमदार यांनी किराणा घराण्याच्या विख्यात गायिका सरस्वतीबाई राणे यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जायला सुचवलं. मीना सांगते, ‘‘आपली पाटी कोरी करून मी पुन्हा एक नवी सुरवात केली.’’ सरस्वतीबाईंनी ‘भूप’, ‘यमन’ इतके तयार करून घेतले की त्यातून एक नवी दिशा मिळाली. स. प. महाविद्यालयाची स्नेहसंमेलनं, यूथ फेस्टिव्हल्स तिनं गाजवली. ती ‘परशुरामीय गायिका’ झालीच, पण पुण्यात नव्यानं सुरू झालेल्या विश्वनाथ ओक यांच्या ‘स्वरानंद’च्या व्यासपीठावर मीना गायली. यावर कळस चढवला गेला तो ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवात’ तिची उदयोन्मुख गायिका म्हणून निवड झाली! खुद्द पंडित भीमसेनजींनी मीनाला ‘सवाई’च्या रंगमंचावर आमंत्रित केलं. साल होतं १९७०. मीना सांगते, ‘‘थोर कलाकार गाऊन गेल्यावर मोठे दडपण असते. मोठा श्रोतृवर्ग पाहून छाती दडपली होती. पण ‘बागेश्री’चे आलाप सुरू केले आणि श्रोत्यांकडून प्रतिसाद आला. मग मी गाण्यात रंगून गेले.’’
‘सवाई’नंतर शास्त्रोक्त संगीताची वाट निश्चित झाली, पण मीनाला सुगम, भावगीत, चित्रपट गीत गाण्यासाठी खूप बोलावणी येऊ लागली. मुकुंद गोस्वामींच्या नृत्यनाट्यासाठी ध्रुपद धमार शैलीचे गायनही तिनं केलं. पॉलीडॉर रेकॉर्ड कंपनीनं मीनाचा आवाज पसंत केला. एन. दत्तांनी त्यासाठी काही गीतं, भजनं केली होती. रेडिओ जेम्समध्ये पॉलिडॉरच्या कामसाठी जात असताना तिथं विख्यात अभिनेत्री मीनाकुमारी भेटल्या. त्यांची शायरी ध्वनिमुद्रित करीत होत्या. त्यांनी मीनाचं गाणं ऐकलं आणि म्हणाल्या, ‘‘उत्तम गळा दिला आहे. तुझं गाणं वाढव. सिनेमासाठी विचारलं तर मुळीच जाऊ नकोस.’’ मीनानं हा कानमंत्र लक्षात ठेवला.
पुण्याच्या ‘मेलडी मेकर्स’ या ऑर्केस्ट्रात गाण्यासाठी जयंत जोशी हे रुबाबदार निवेदक बोलवायला आले. या वेळी जयंत जोशींनी तिला मागणी घातली. उभयतांनी सामंजस्यानं संसार केला. जयंत जोशींनी निवेदनाच्या क्षेत्रात मोठी बाजी मारली. मात्र मीनानं किशोरी आमोणकर, गझल गायिका मधुराणी यांच्याकडे शिक्षण सुरू ठेवलं आणि दोन मुलांसह संसारही सुखाचा केला. तिचा फोटोंचा अल्बम बहुरंगी आहे. सुनील दत्त यांच्याबरोबरचा स्टेज शो, नंदू भेंडे यांच्याबरोबर इंग्लंड दौरा, ‘सूरजहाँ’ हा तिचा खास कार्यक्रम, किशोरीताईं बरोबरची मैफल, वसंत देसाईंकडून पारितोषिक, सुरेश वाडकरांबरोबरचे कार्यक्रम असं कितीतरी. पण मीना श्री शंकराचार्य यांची सुमधुर स्तोत्रं, श्री महागणपती स्तुती गात आहे. ‘सुवर्णवर्णसुंदरम’ची दीप्ती मीनाचं सुंदर सहजीवन उजळून टाकत आहे. मीनाला खूप खूप शुभेच्छा!
-----
छायाचित्र - ७४७३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com