

पुणे, ता. २४ ः ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत अमेरिकेतील नागरिकांकडून दररोज लाखो रुपये उकळणाऱ्या खराडीतील बनावट कॉल सेंटरचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. येथे तब्बल १२३ कर्मचारी काम करीत होते. त्यांच्याकडे रोज तब्बल एक लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा देण्यात येत होता, असे पोलिस तपासातून पुढे आले आहे.
खराडी-मुंढवा रस्त्यावरील प्राइड आयकॉन या इमारतीच्या नवव्या मजल्यावर ‘मैग्नटेल बीपीएस अॅण्ड कन्सल्टंट’ या नावाने हे कॉल सेंटर सुरू होते. ‘तुमच्या खात्यातून अमली पदार्थांचे व्यवहार झाले आहेत. या व्यवहारांमुळे तुम्हाला पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते,’ अशी भीती दाखवत रोज सायबर फसवणुकीच्या माध्यमातून तब्बल ३० ते ४० हजार डॉलर्स (सुमारे ३२ ते ३३ लाख रुपये) अमेरिकन नागरिकांकडून उकळले जात होते. हा पैसा हवालाच्या माध्यमातून भारतात येत होता. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली असून, मुख्य सूत्रधारासह तिघे फरारी आहेत. अटक केलेले आरोपी हे गुजरात, राजस्थान या राज्यातील असून, बहुतांश कर्मचारीदेखील परराज्यातील आहेत.
सरबजितसिंग गिरावतसिंग शेखावत (सध्या रा. खराडी, मूळ रा. झुनझुनू, राजस्थान), अभिषेक अजयकुमार पांडे, श्रीमय परेश शहा, लक्ष्मण अमरसिंग शेखावत आणि अॅरोन अरुमन खिश्चन (सर्व मूळ रा. अहमदाबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर करण शेखावत (रा. अहमदाबाद), संजय मोरे आणि केतन रवाणी हे तिघे फरारी आहेत. यातील करण शेखावत हा सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे, तर अटक केलेल्यांपैकी सरबजितसिंग शेखावत हा व्यवस्थापक म्हणून काम करायचा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथे कॉल सेंटर असून, तेथून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक होत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता. २३) रात्री साडेदहाच्या सुमारास गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी कॉल सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी तेथे १२३ कर्मचारी कार्यरत होते. त्यात १२ महिला होत्या. हे सर्वजण कर्मचारी म्हणून तेथे काम करीत होते. पहाटे सहा वाजेपर्यंत पोलिसांनी कॉल सेंटरची झडती घेतली. प्राथमिक चौकशीनंतर त्यांच्याकडून काम करून घेणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली, तर तीन फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, स्वप्नाली शिंदे, शब्बीर सय्यद, प्रताप मानकर, वाहिद पठाण, उपनिरीक्षक तुषार भोसले, वैभव मगदूम, कैलास चव्हाण, अविनाश इंगळे, एकनाथ जोशी, विजय पवार, नीलेश जाधव, हरीश मोरे, विशाल इथापे, सुभाष आव्हाड, विठ्ठल वाव्हळ, प्रवीण रजपूत, सीमा सुडीत, स्मिता हंबीर आणि जान्हवी मडेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
रात्रीस खेळ चाले
कॉल सेंटरमध्ये अमेरिकन वेळेनुसार सायंकाळी सहा ते रात्री दोनपर्यंत काम चालायचे. येथून पोलिसांनी ६४ लॅपटॉप, ४१ मोबाईल, ४ राउटर जप्त केले आहेत. कर्मचाऱ्यांना रोज फोन करण्यासाठी दिली जाणारी एक लाख जणांची यादी नेमकी कुठून आणि कशी येत होती, फसवणुकीनंतर मिळणारे पैसे देशात कसे येत होते, याबाबत गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.
जप्त मुद्देमाल
- ६१ लॅपटॉप
- ४१ मोबाईल फोन
- ४ राउटर
- डिजिटल डेटा आणि कागदपत्रे
यापूर्वीदेखील झाली कारवार्इ
२०२२ मध्ये हिंजवडी परिसरात एका बनावट कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला होता. ज्यामधून अमेरिकन नागरिकांना फसवले जात होते. २०२१ मध्ये बाणेर परिसरात अशाच प्रकारच्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला होता. जेथे नोकरीच्या बहाण्याने पैसे उकळले जात होते. मात्र, खराडीतील ही कारवाई ही आतापर्यंतची सर्वांत मोठी मानली जात आहे.
कारवाईची भीती दाखवून अमेरिकन नागरिकांची सायबर फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपी अमेरिकेतील नागरिकांचा डेटा कसा मिळवीत होते, यामध्ये आणखी कोण सहभागी आहेत, याबाबत तपास करण्यात येत आहे. इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. गुन्ह्यात सहभाग असलेल्यांवर कारवार्इ करण्यात येणार आहे.
- रंजनकुमार शर्मा, सहपोलिस आयुक्त, पुणे शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.