पुण्‍यात कोरोनाचे सात रुग्ण; राज्‍यात १६६

पुण्‍यात कोरोनाचे सात रुग्ण; राज्‍यात १६६
Published on

पुणे, ता. २४ : पुण्‍यात कोरोनाची रुग्‍णसंख्‍या नगण्य असून सध्‍या संपूर्ण राज्‍यात १६६ रुग्‍ण सक्रिय आहेत. सर्व रुग्‍णांना लक्षणे सौम्‍य असून नागरिकांनी त्‍याबाबत काळजी घ्यावी मात्र, घाबरून जाऊ नये असा सल्‍ला राज्‍याच्‍या साथरोग विभागाने दिला आहे.
राज्‍यात २४ मे रोजी ४७ नवीन रुग्ण आढळले. त्यापैकी मुंबईत सर्वाधिक ३०, पुणे महापालिकेत ७, नवी मुंबईत ३, ठाणे महापालिकेत ६, तर नागपूर महापालिकेत एक रुग्णाची नोंद झाली आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत सात हजार संशयित रुग्‍णांच्‍या चाचण्‍या केल्‍या असून त्‍यापैकी २५७ रुग्‍ण पॉझिटिव्‍ह आढळून आले होते. यामधून आतापर्यंत ८७ रुग्‍ण बरे झाले तर चार जणांचा मृत्‍यू झालेला आहे. सध्‍या राज्‍यात १६६ सक्रिय आहेत. त्‍यामध्‍ये पुणे महापालिकेच्‍या हद्दीत सात रुग्‍णांचा समावेश आहे.
मुंबईमध्‍ये कोविड रुग्णसंख्येत सौम्य वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात म्‍हटले आहे. कोविडची लक्षणे सौम्य स्वरूपाची असून बहुतेक रुग्ण घरच्या घरीच उपचार घेत आहेत. तर, सध्या मृत्यूमुखी पडलेल्या चार रुग्णांपैकी सर्वच रुग्ण गंभीर सहव्याधींनी ग्रस्त होते. त्यामध्ये नेफ्रोटिक सिंड्रोम, क्षयरोग, पक्षाघात व मधुमेह अशा सहव्‍याधी होत्‍या. दरम्‍यान, शनिवारी ठाण्‍यात २१ वर्षीय रुग्‍णाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला असून त्‍याचा समावेश राज्‍याच्‍या अहवालात अद्याप केलेला नाही.

सतर्क राहण्याचे आवाहन
सध्या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध असून इन्फ्लुएन्झासदृश आजार व गंभीर तीव्र श्वसन संसर्ग या रुग्णांची नियमित तपासणी सुरू आहे. राज्यातील स्थिती नियंत्रणात असून इतर राज्यांमध्ये व काही देशांमध्येही अशीच तुरळक वाढ दिसून येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन साथरोग विभागाच्‍या सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com