अनेक कुटुंबांचे ‘जीवनसारथी’

अनेक कुटुंबांचे ‘जीवनसारथी’

Published on

माझे सासरे श्रीपाद वामन काळे (नाना) यांचे २५ वर्षांपूर्वी वयाच्या नव्वदाव्यावर्षी निधन झाले. त्यांनी स्त्रीमुक्तीची सुरुवात घरापासूनच केली. घरातल्या कामगार महिलांना, गरजू महिलांना शिवण, रांगोळ्या घालणं, रुचकर पदार्थ बनवणं याबरोबरच लिहा-वाचायलाही शिकवलं. लेखनातून ते अनेक कुटुंबांचे ‘जीवनसारथी’ बनले. आज सोमवारी (ता. २६) त्यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्त...
- जयश्री काळे

नानांचे आचारविचार आजच्या काळातही सुसंगत आणि मार्गदर्शक ठरणारे आहेत. त्याचा प्रत्यय मला लग्नाच्यावेळीच आला. विश्वास आणि मी परस्परसंमतीनं लग्न ठरवलयं, हे कळल्यावर त्यांनी मला पाहिलेलं नसतानाही आनंदाने होकार दिला आणि निम्मा लग्नखर्च उचलला. नाना ४९ वर्षांचे असताना त्यांच्या पत्नी प्रभावतीबाईंचे अपघाती निधन झाले. प्रभावतीबाईंची सांसारिक कर्तव्यं पार पाडण्यातील दक्षता, दुसऱ्‍याच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती, या सगळ्यांबद्दल नाना माझ्याशी भरभरून बोलत. त्याकाळी ‘स्त्री-मुक्ती’ या विषयाबाबत फारशी जागृती नव्हती. स्त्रीचं स्थान दुय्यम नसून ते बरोबरीचं असतं, याबाबत नाना ठाम होते. 
नानांनी स्त्रीमुक्तीची सुरुवात घरापासूनच केली. प्रभावतीबाई एकोणीसाव्या वर्षी पुण्याला प्रा. वा. गो. काळे यांच्या प्रतिष्ठित कुटुंबात आल्या. त्यांनी प्रभावतीबाईंना पोहणं, सायकलिंग, टेनिस, बॅडमिंटन यात तरबेज केलं. त्या दोघांनी जोडीनं स्थानिक आणि राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेत खेळून मिळवलेल्या करंडकांनी एक मोठं कपाट भरलेलं आहे. घरातल्या कामगार महिलांना, गरजू महिलांना शिवण, रांगोळ्या घालणं, रुचकर पदार्थ बनवणं याबरोबरच लिहा-वाचायलाही शिकवलं. आपले पहिले पुस्तक ‘कण आणि क्षण’ त्यांनी प्रभावती यांना अर्पण केलं आहे.
नाना स्वत:ही त्यांच्या लेखनातून अनेक कुटुंबांचे ‘जीवनसारथी’ बनले. ‘स्त्री’, किर्लोस्कर मासिकातील ‘कौटुंबिक हितगूज हे त्यांचं सदर खूप गाजलं. त्यांची १८ पुस्तकं पुनरावृत्यांसह प्रसिद्ध झाली. काहींचे गुजरातीत भाषांतर केली. त्याकाळी म्हणजे १९८४ पर्यंत कुटुंब न्यायालये, समुपदेशन यांसारखी फारशी व्यवस्था नव्हती. एका विचारी, अनुभवी, प्रगल्भ समुपदेशकाचं कार्यच नानांच्या लेखनानं केलं. 
वडील प्रा. वा. गो. काळे हे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ. त्यांनी सुरू केलेले आर्थिक आणि व्यापारी घडामोडींचा परामर्श घेणारे ‘अर्थ’ साप्ताहिक नानांनी पुढे ३० वर्षे नेटानं गुणवत्तेशी तडजोड न करता चालवलं. मला भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर बोलवण्यात आलं, तेव्हा मी नानांचा सल्ला घेतला. त्यांच्या दूरदृष्टीची प्रचिती संचालक म्हणून काम करताना मला येत आहे.
शक्य असेल तर नोकरीतील जागा अडवण्यापेक्षा नोकरी निर्माण करणारं व्हावं, असं त्यांच मत होतं. विश्वासनं चांगली नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करताना त्यांचा पाठिंबा होता. मी देखील राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारीपदाची नोकरी सोडून ‘जागृती सेवा संस्था’ सुरू केली, तेव्हा त्यांनी खूप मदत केली.
लंडनच्या ‘फॉईल्स’ या पुस्तकाच्या दुकानात चालणाऱ्या चर्चासत्रांप्रमाणे १९५९ मध्ये पुण्यात त्यांनी ‘फॉईल्स क्लब’ सुरू केला. तिथे साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी अनौपचारिक संवाद होत असतं. नानांनी हे खुले व्यासपीठ २० वर्षे चालवले. शोको नाकागावा हिला मराठी शिकायचं होतं. नानांनी ही जबाबदारी स्वीकारली. शोको सहा महिन्यांत उत्तम मराठी बोलायला आणि लिहायला-वाचायलाही शिकली. नानांच्या सांगण्यावरून तिनं ‘श्यामची आई’ पुस्तकाचं जपानीत भाषांतर केलं. जपानमध्ये हे पुस्तक अतिशय लोकप्रिय झालं. 
आपल्यामुळे कोणालाही मानसिक, शारीरिक तसदी पडता कामा नये याबाबत नाना आग्रही होते. शेवटच्या दिवसापर्यंत हिंडत-फिरत रात्री दासबोध वाचून ते शांतपणे झोपी गेले. झोपेतच कोमात जाऊन तीन दिवसांनी निवर्तले. पत्नीच्या अकाली निधनानं आलेला एकटेपणा स्वत:पुरताच मर्यादित ठेऊन नानांनी आपले निर्व्यसनी दीर्घायुष्य लोकोपयोगी लिखाण आणि कार्य करत सार्थकी लावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com