

पुणे, ता. २४ : पुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या रविवारी आठने वाढली असून, ती आता १५ वर पोचली आहे. त्यापैकी एक रुग्ण ग्रामीण भागातील तर उर्वरित १४ महापालिका हद्दीतील आहेत. राज्यातही सक्रिय रुग्णसंख्या २०९ वर पोचली आहे. सर्व रुग्णांना लक्षणे सौम्य असल्याची माहिती साथरोग विभागाने दिली.
राज्यात २४ मे रोजी ४७ नवीन रुग्ण आढळले होते. त्यापैकी मुंबईत सर्वाधिक ३०, पुणे महापालिकेच्या हद्दीत सात, नवी मुंबईत तीन, ठाणे महापालिकेत सहा, तर नागपूर महापालिकेत एका रुग्णाची नोंद झाली होती. दुसऱ्या दिवशी २५ मे रोजी राज्यात आणखी ४५ रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये मुंबईमध्ये ३५, पुणे महापालिकेच्या हद्दीत सात तर पुणे ग्रामीणमध्ये एका रुग्णाचा समावेश आहे. जानेवारीपासून आतापर्यंत सात हजार ३७९ संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या असून, त्यापैकी ३०० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. यामधून आतापर्यंत ८७ रुग्ण बरे झाले, तर चार जणांचा मृत्यू झालेला आहे.
मुंबईमध्ये कोविड रुग्णसंख्येत सौम्य वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे. कोविडची लक्षणे सौम्य स्वरूपाची असून, बहुतेक रुग्ण घरच्या घरीच उपचार घेत आहेत, तर मृत्युमुखी पडलेल्या चार रुग्णांपैकी सर्वच रुग्ण गंभीर सहव्याधींनी ग्रस्त होते. सध्या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध असून, इन्फ्लुएन्झासदृश आजार व गंभीर तीव्र श्वसन संसर्ग या रुग्णांची नियमित तपासणी सुरू आहे. राज्यातील स्थिती नियंत्रणात असून, इतर राज्यांमध्ये व काही देशांमध्येही अशीच तुरळक वाढ दिसून येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन साथरोग विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.