एकच घर, तरीही सवलत नाही
पुणे, ता. २६ : पुण्यात एकच मिळकतकर आहे. त्या घरात राहत असूनही पुणे महापालिकेकडून मला ४० टक्क्यांची सवलत मिळाली नाही. गेल्या दोन वर्षांपासून मी ‘पीटी-३’ अर्ज भरत आहे. मला सवलत दिली जात नसल्याने आर्थिक भूर्दंड बसत आहे. अनेकदा येरवडा क्षेत्रीय कार्यालयात हेलपाटे मारले, आता पुन्हा अर्ज करावा लागला आहे, अशी कैफियत कळस येथील रहिवासी योगेश म्हस्के मांडत होते. म्हस्के हे केवळ एक उदाहरण आहे, पण अशा प्रकारे पुण्यात हजारो नागरिकांना मिळकतकराची मोठ्या रकमेची बिले बघून डोळे फिरण्याची वेळ आली आहे.
पुणे महापालिकेचा मिळकतकर विभाग तीन-चार वर्षांपूर्वी अतिशय शिस्तबद्ध होता. नागरिकांना वेळेवर बिल पाठवणे, त्याची योग्य पद्धतीने वसुली करण्याकडे लक्ष दिले जात होते. पण आता या विभागात सावळा गोंधळ सुरु आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. महापालिकेतर्फे दरवर्षी एक एप्रिलपासून मिळकतकराची बिले वाटली जात होती. पण यंदा चक्क एक महिना उशीर झाला आहे.
एक महिना उशिराने वसुली
महापालिकेकडे ४० टक्के सवलतीसाठी पीटी-३ अर्जासह सर्व पुरावे जोडले होते. त्यामुळे यंदा सवलत मिळेल व यापूर्वी जे जादा पैसे भरले आहेत, ते मिळकतकरातून वजा केले जातील असे वाटत होते. पण प्रत्यक्षात नागरिकांकडून १०० टक्के कर वसुली केली जात असून, त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. ४० टक्क्यांनुसार कर वसुलीसाठी बिलात व सॉफ्टवेअरमध्ये बदल करणे आवश्यक होते, त्यामुळे प्रशासनाने एक महिना उशिरा म्हणजे १ मे पासून कर वसुली सुरु केली. पण त्यानंतरही प्रशासनाला या सवलतीची अंमलबजावणी करता आलेली नाही. चूक लक्षात आल्यानंतर बिलात सुधारणा करून सवलत दिली जाईल, अशी सारवासारव प्रशासनाकडून केली जात आहे.
१९७० पासून होती सवलत
राज्य सरकारने पुणे महापालिकेच्या १९७० पासून दिल्या जाणाऱ्या ४० टक्के सवलतीवर आक्षेप घेत ही सवलत बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापालिकेने खासगी कंपनीकडून शहरात सर्वेक्षण करत एकापेक्षा जास्त मिळकती असणारे किंवा घर भाड्याने दिलेल्या मिळकतींची माहिती संकलित केली. त्यानुसार २०१९ नंतर सुमारे ४ लाख ६४ हजार २२२ निवासी मिळकतींची ४० टक्केची सवलत बंद करून त्यांच्याकडून १०० टक्के कर वसुली सुरु केली. हे सर्वेक्षण चुकीचे झाल्याने एक घर असूनही व स्वतः राहत असूनही अनेकांची सवलत गेली. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात ‘सकाळ’ने पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्य सरकारने २०२३ मध्ये पुन्हा सवलत लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नागरिकांना पुन्हा एकदा पीटी-३ अर्ज भरायला लावून सवलत घेण्यासाठी आवाहन केले होते. पण हा गोंधळ यंदाचे पाच महिने संपत आले तरीही संपलेला नाही.
दुसरे सर्वेक्षणही कागदोपत्री ?
राज्य सरकारच्या निर्णयानंतर नागरिकांना सवलत घेण्यासाठी ‘पीटी ३’ अर्ज व मिळकतधारक स्वतः राहत असल्याचा पुरावा सादर करण्यास सांगितले. पण केवळ ९५ हजार अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे २०२४ मध्ये महापालिकेच्या सुमारे ३५० कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून ‘पीटी ३’ अर्ज भरून घेण्यासाठी मोहीम राबविली. प्रत्यक्ष जागेवर जाऊन ४ लाख ६३ हजार २२२ मिळकतींची पाहणी केली. त्यात २ लाख ४२ हजार ६ मिळकतींमध्ये घरमालक राहत असल्याचे दिसून आले. उर्वरित २ लाख २० हजार ६१६ घरांमध्ये भाडेकरू राहत असल्याचे सांगत त्यांची सवलत महापालिकेने काढून घेतली होती. मात्र, आता २०२५-२६ या वर्षाची मिळकतकराची बिले आल्यानंतर अनेक नागरिकांना पुन्हा १०० टक्के कर आकारणीचे बिल आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने दुसरे सर्वेक्षणही कागदोपत्री केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०२५-२६ या वर्षाच्या मिळकतकराच्या बिलात ४० टक्क्यांची सवलत मिळाली नसल्याच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. या नागरिकांना कागदपत्र, पीटी-३ अर्ज व पुरावे जमा करण्यास सांगितले आहे. नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
- अविनाश सपकाळ,
उपायुक्त, मिळकतकर विभाग
अशी आहे स्थिती
- नागरिकांना क्षेत्रीय कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ
- कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे
- मुख्य खात्याकडून अद्याप सुधारित आदेश नाही
- गतवर्षी भरलेली जादा रक्कम बिलातून वळती केली नाही
अशी आहे स्थिती....
१४.२५ लाख
- शहरातील मिळकती
९ लाख
- निवासी मिळकती
४.६४ लाख
- १०० टक्के कर (निवासी मिळकती)
२.४२ लाख
- सर्वेक्षणानंतर ४० टक्के सवलत मिळालेल्या मिळकती
२.२० लाख
- सर्वेक्षणानंतरही ४० टक्के सवलत नसलेल्या मिळकती
४०० कोटी
- १ मे ते २६ मे पर्यंत जमा झालेला मिळकतकर
----
- कर भरणाऱ्या मिळकतधारकांची संख्या
तुमचे मत मांडा.....
पुण्यात एकच मिळकतकर अन् त्या घरात राहत असूनही पुणे महापालिकेने अनेकांना ४० टक्क्यांची सवलत मिळाली नाही. याचा फटका अनेक नागरिकांना बसला असून त्यांना क्षेत्रीय कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. याबाबत तुमचे मत मांडा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.