तिघांचा खून करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास जन्मठेप

तिघांचा खून करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास जन्मठेप

Published on

पुणे, ता. २७ : शस्त्रागारातून पिस्तूल व मॅगझीन लंपास करत त्याआधारे तिघांचा खून करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास न्यायालयाने जन्मठेपेसह तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.

संजय बळिराम शिंदे (रा. सरपंचवस्ती, ता. दौंड) असे शिक्षा सुनावलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून दोघांना तर किरकोळ भांडणाच्या कारणावरून एकास असे एकूण तिघांना शिंदेने गोळ्या घातल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. दौंड परिसरातील नगरमोरी चौकात १६ जानेवारी २०१८ मध्ये ही घटना घडली होती.

गोपाळ काळुराम शिंदे (वय ३४, रा. दौंड), परशुराम गुरूनाथ पवार (वय २८, रा. दौंड) अनिल विलास जाधव (वय ३४, रा. लिंगाळी, ता. दौंड) यांचा खून झाला होता. याप्रकरणी, गजानन काळुराम शिंदे (वय ३२, रा. दौंड) यांनी फिर्याद दिली होती. गोपाळ हे गजानन यांचे भाऊ असून परशुराम हे मेहुणे आहेत. उसने घेतलेले पैसे परत करण्यावरून गोपाळ शिंदे व संजय शिंदे यांच्यात वाद झाला होता. याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी त्यांच्या मेहुण्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संजय याने गोपाळवर गोळी झाडली. त्यानंतर, संजय याने अनिल जाधव याच्या घरी जात त्याच्यावरही गोळी झाडून त्याचा खून केला.

या खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी पाहिले. त्यांनी ३२ साक्षीदार तपासले. यामध्ये, चार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, बॅलेस्टीक एक्स्पर्ट आणि डॉक्टरांचा अहवाल महत्त्वाचा ठरला. न्यायालयाने सरकार पक्षासह बचावपक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपीला शिक्षा सुनावली.

बॅलेस्टीक एक्स्पर्टची अमेरिकेतून नोंदविली साक्ष
संजय शिंदे हा नगरच्या दिशेने जात असताना त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे पिस्तूल, १२ जिवंत काडतुसे आणि दोन मॅगझीन आढळून आल्या होत्या. दोन्ही घटनास्थळी ज्या दहा पुंगळ्या मिळाल्या त्या तपासणीसाठी बॅलेस्टीक एक्स्पर्टकडे पाठविण्यात आल्या. या प्रकरणात, सध्या अमेरिकेत कार्यरत असलेल्या बॅलेस्टीक एक्स्पर्टची साक्ष अमेरिकेतून व्हीसीद्वारे नोंदविण्यात आली. सकाळी साडेदहा वाजता न्यायालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर एक्स्पर्ट साक्षीसाठी अमेरिकेतील वेळेनुसार रात्री दोन वाजता न्यायालयात हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com