बेशिस्त वाहनचालकांवर ‘एआयची’ नजर

बेशिस्त वाहनचालकांवर ‘एआयची’ नजर

Published on

पुणे, ता. २९ ः बेशिस्त वाहन चालकांना चाप लावत वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवार्इ करण्यासाठी नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन रस्ता) कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीवर आधारित कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
वाहनचालकांची एकाहून अधिक रांगा करून वाहन पार्क केल्यामुळे फर्ग्युसन रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होते. यावरून अनेक वेळा वाहनचालक किंवा त्यांच्या चालकांकडून पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकारही घडतात. आता ‘एआय’ प्रणालीमुळे चालकाचे वाहन, क्रमांक व नियमभंग याचे छायाचित्र लगेच टिपले जाईल. त्यासाठी सहा ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

वाहन न हलविल्यास दंडात्मक कारवार्इ
वाहनचालकांनी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्यास, त्यांचे वाहन आणि क्रमांक ‘एआय’ कॅमेऱ्याद्वारे टिपले जाणार असून एक मिनिटात वाहन न हलविल्यास थेट दंड आकारला जाणार आहे. तसेच, विरुद्ध दिशेने येणारी वाहने, दुहेरी पार्किंग आणि रस्त्यावर अधिक वेळ वाहन उभे करणे आदी गोष्टींवरही ‘एआय’द्वारे कारवाई केली जाणार आहे.
या प्रणालीचे उद्‍घाटन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे आणि पोलिस निरीक्षक (वाहतूक नियोजन) सुनील गवळी उपस्थित होते.

विमानतळाबाहेरील रस्त्यावरही ‘एआय’ यंत्रणा
विमानतळाबाहेरील रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येथे रस्त्यावर केल्या जाणाऱ्या बेशिस्त पार्किंगला चाप लावणे गरजेचे आहे. यासाठी या रस्त्यावरही लवकरच ‘एआय’वर आधारित कारवाईची यंत्रणा उभी केली जाणार आहे. पोलिस आयुक्तांनी विमानतळ प्रशासनाला त्याबाबत विनंती केली असून त्यांच्याकडून ती यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

अशी होणार कारवार्इ
- गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिजिटल स्क्रीन बसवले जातील
- बेकायदा व रांगेने पार्किंग करणाऱ्या वाहनांची हे कॅमेरे ओळख करून त्यांचा क्रमांक स्क्रीनवर दाखवतील
- वाहनचालकाला वाहन हटवण्यासाठी फक्त एक मिनिटाचा अवधी दिला जाईल
- वेळेत वाहन हलवले न गेल्यास थेट ऑनलाइन दंड केला जार्इल

बेशिस्तीवर कारवाई करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी एआय प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. शहरातील इतर गर्दीच्या भागातही भविष्यात ही यंत्रणा राबवण्याचा विचार आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून सार्वजनिक रस्त्यांचा सुसज्ज वापर करावा. फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि महात्मा गांधी रस्ता हे रस्ते आदर्श रस्ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

काही वाहनचालक वाहन रस्त्यावर उभे करून कार्यालये किंवा खाद्यपदार्थ विकणाऱ्या ठिकाणी जातात. काही प्रकरणांत चालक वाहनातच बसून राहतात व पोलिसांनी हटविण्यास सांगितल्यास वाद घालतात. या नव्या यंत्रणेमुळे अशा घटनांमध्ये घट होईल आणि वाहतुकीला शिस्त लागेल.
- मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com