लतादीदीच माझी खरी आई!

लतादीदीच माझी खरी आई!

Published on

पुणे, ता. ३० ः ‘‘लता मंगेशकर हीच माझी खरी आई होती. शांता शेळके यांच्या ‘जिवलगा’ या गीतातील ‘जिवलगा’ नक्की कोण याचा प्रश्‍न मला पडायचा. लतादीदीच्या निधनानंतर मला त्याचा उलगडा झाला आणि लताच माझी ‘जिवलगा’ होती याची मला खात्री पटली. तिच्या निधनानंतर तिचे पार्थिव ठेवलेल्या गाडीवर ‘लग जा गले’ हे गीत वाजत होते आणि आता लताची आणि माझी ‘मुलाकात’ पुन्हा होणार नाही, याची खात्री पटली आणि हे गाणे माझ्या हृदयाच्या खूप जवळ जाऊन पोचले...’’ पंडित हृदयनाथ मंगेशकर लतादीदींच्या आठवणी सांगत होते. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते ‘सकाळ’च्या कार्यालयात आले होते.
सुखाची फार आठवण राहत नाही. दुःखातूनच प्रतिभा जन्म घेत असते, असे सांगत ते म्हणाले, ‘‘माझ्या आणि लताच्या वाटेला लहानपणापासून दुःखच आले. वडील वारले त्यावेळी मी पाच-सात, तर लता बारा वर्षांची होती. त्या वयात त्या मुलीने संपूर्ण घराची जबाबदारी घेतली. या सर्व दुःखांची जाणीव असली तरी मी आयुष्यात दुःखी अजिबात नाही. आपल्याला आयुष्यातील वाईट, विपन्नावस्थेतील काळातील आठवणी कायमस्वरूपी लक्षात राहतात. तोच काळ जास्त आठवतो. त्यातच निर्मितीक्षमता असते. सुखाच्या काळात निर्मिती होत नाही. दुःखामुळे भावजीवन समृद्ध झाले आहे.’’
ते म्हणाले, ‘‘दीदीबरोबर अनेक प्रसंगी मतभेद झाले. तिने चित्रपट संगीत देण्यासाठी ‘आनंदघन’ नाव घेतले. मी तिचा सहायक होतो. ‘मोहित्यांची मंजुळा’ चित्रपटावेळी मला काही गाण्याचे नोटेशन तिने काढायला सांगितले. मी काढलेले नोटेशन दीदीला आवडले नाहीत. ती म्हणाली, ‘खूप मॉडर्न वाटतात.’ मी दीदीला सांगितले मला असेच जमते. त्यावरून तिने मला एकतर्फीच काढून टाकले, मात्र कालांतराने मी केलेले गाणेच चित्रपटात घेतले. दीदी खूप उदारमतवादी होती.’’ एकीकडे ज्ञानेश्वर माउलींचे अभंग, तर दुसरीकडे ग्रेसांच्या कवितांना चाली लावणे, हे कसे शक्य झाले, यावर ते म्हणाले, ‘‘आईने मला अनेक साहित्यिकांचे साहित्य वाचून दाखविल्याने ते समजत गेले. राम शेवाळकर, शंकर वैद्य आदी अनेक साहित्यिकांकडून मी अनेक गोष्टी समजून घेतल्या. मला गो. नी. दांडेकर, शंकर वैद्य, शांता शेळके आदींची संगत मिळाली. मी प्रबुद्ध नाही, परंतु अनभिज्ञही नाही. दिग्गजांच्या सहवासामुळे समृद्ध झालो.’’

म्हणून हिंदीत रमलो नाही...
हिंदी चित्रपट सृष्टीत का रमला नाहीत, यावर ते म्हणाले, ‘‘माझा स्वभाव तडजोड करण्याचा नसल्यामुळे हिंदीत रमलो नाही. हिंदीतील कवी चालींवर गाणे तयार करतात, तर मराठीमधील कवी चालींवर गाणी तयार करतातच त्याचबरोबर स्वतंत्र कविताही करतात.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com