‘एनएसडी’चे आता मुंबईतही केंद्र

‘एनएसडी’चे आता मुंबईतही केंद्र

Published on

महिमा ठोंबरे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ७ ः नाट्य प्रशिक्षण क्षेत्रातील देशातील सर्वोच्च संस्था असणाऱ्या राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात ‘एनएसडी’ने आता मुंबईत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रात एक वर्षाचा अभिनय प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. मात्र, वर्षभराच्या या अभ्यासक्रमासाठी तब्बल सहा लाख रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
‘एनएसडी’ने त्यांच्या फेसबुक पेजवर याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईत अंधेरी पश्चिम येथे हे केंद्र सुरू करण्यात येत आहे. एक वर्षाचा हा पूर्णवेळ अभ्यासक्रम सहा महिन्यांच्या दोन सत्रात होणार आहे. प्रत्येक सत्रासाठी तीन लाख रुपये प्रवेश शुल्क किंवा एकत्रित भरल्यास पाच लाख रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण आणि १८ वर्षे वयाची अट असून, एका वर्गासाठी ३० विद्यार्थ्यांची मर्यादा आहे. या अभ्यासक्रमासाठी एक ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची निवडचाचणी १० ऑक्टोबरला होणार असून, १५ ऑक्टोबरपासून अभ्यासक्रमाला प्रारंभ होईल.
प्रवेश शुल्क आकारण्यात येणारा हा ‘एनएसडी’चा हा पहिलाच अभ्यासक्रम आहे. ‘एनएसडी’चे सध्या दिल्लीसह सिक्कीम, बंगळूर, त्रिपुरा आणि वाराणसी अशा पाच ठिकाणी केंद्र आहेत. दिल्लीतील मुख्य केंद्रात तीन वर्षांचा निवासी पदविका अभ्यासक्रम चालवला जातो, मात्र हा पदव्युत्तर दर्जाचा अभ्यासक्रम मानला जातो. यासह अन्य केंद्रांवर एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, त्यातून त्यांचा खर्च भागतो.

सहा लाख रुपयांच्या शुल्कावर नाराजी
सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमुळे ‘एनएसडी’मध्ये देशभरातील गुणवान विद्यार्थ्यांना नाट्य प्रशिक्षण घेणे शक्य होत आहे. मात्र, मुंबईतील केंद्रावर आकारण्यात येणारे सहा लाखांचे शुल्क धक्कादायक आहे. निम्न आर्थिक स्तरातील किंवा अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना हे शुल्क परवडणारे नसल्याने त्यांच्यासाठी तर या केंद्राची दारे बंदच झाल्यासारखे आहे, अशी नाराजी नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी व्यक्त केली.

मुंबई हा नाट्य व चित्रपटसृष्टीचा केंद्रबिंदू असल्याने येथे ‘एनएसडी’चे केंद्र सुरू होणे गरजेचेच होते. ‘एनएसडी’तील शिक्षणाच्या दर्जामुळे हे केंद्र मुंबईतील अन्य अभिनय प्रशिक्षण केंद्रांपेक्षा वेगळे ठरेल. या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही रकमेचे प्रवेश शुल्क आकारले असते, तरी त्यावर आक्षेप घेतले गेलेच असते. मात्र ‘एनएसडी’ने कायम मोफतच प्रशिक्षण द्यावे, ही अपेक्षा अवाजवी आहे. प्रवेश शुल्क आकारणे, हा कालानुरूप होणारा आणि अपरिहार्य बदल आहे. प्रवेश शुल्कावर विद्यार्थ्याची गुणवत्ता आणि भवितव्य अवलंबून नाही. ज्यांना प्रवेश शुल्क परवडणारे नाही, त्यांच्यासाठी दिल्लीतील केंद्रात प्रवेश घेण्याचा मार्ग खुला आहेच.
- प्रसाद वनारसे (विद्यानिधी), ज्येष्ठ रंगकर्मी

प्रवेश शुल्क भरमसाट असल्याने गुणवत्ता असूनही आर्थिक परिस्थिती भक्कम नसलेली मुले केंद्रापासून दूर होणार आहेत. मात्र, प्रवेश शुल्कापेक्षा मुंबईतील केंद्रावरील प्रवेशाचे निकष, ही मला अधिक चिंतेची बाब वाटते. कारण ‘एनएसडी’च्या अन्य अभ्यासक्रमांसाठी पदवी पूर्ण असणे आणि नाट्यक्षेत्रातील पूर्वानुभवाची अट आहे. येथे मात्र केवळ बारावी उत्तीर्ण असण्याचीच अट आहे. अबोध वयातील आणि पुरेशी जडणघडण न झालेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पातळीच्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी नक्कीच पेलवली जाणार नाही.
- अनिरुद्ध खुटवड, नाट्य दिग्दर्शक आणि ‘एनएसडी’चे प्राध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com