‘दामिनी मार्शल’मुळे पुन्हा पेटला शिक्षणाचा दिवा

‘दामिनी मार्शल’मुळे पुन्हा पेटला शिक्षणाचा दिवा

Published on

पुणे, ता. ८ : शाळेत हुशार असलेली इयत्ता सातवीतील एका विद्यार्थिनीने आठ दिवसांपासून शाळेत येणे बंद केले होते. शिक्षिकेने चौकशी केली असता, त्या विद्यार्थिनीच्या मैत्रिणींकडून समजले की पालक तिचे लग्न ठरवण्याच्या तयारीत आहेत. यावर शाळेतील शिक्षकांनी तत्काळ शिवाजीनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला, आणि पुढे जे घडले, ती फक्त पोलिसी कारवाई नव्हती, तर ती एका कुटुंबाच्या विचारसरणीत बदल घडवणारी महत्त्वपूर्ण बाब ठरली.
शाळेतील शिक्षकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांना तत्काळ शाळेत पाठविले. शिक्षकांनी ‘ती मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे. ती शिकली तर तिचे आणि कुटुंबाचे भवितव्य उज्ज्वल होईल,’ असे सांगत पोलिसांना मदत करण्याची विनंती केली. त्यावर दामिनी मार्शल हिंगे आणि एक शिक्षिका त्या मुलीच्या घरी गेल्या. त्यावेळी माहिती मिळाली की, ती मुलगी चार बहिणींमध्ये सर्वांत मोठी आहे. तिचे आई-वडील रोजंदारीवर मजुरी करतात. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची. नातेवाइकांच्या सल्ल्याने त्यांनी मोठ्या मुलीचे लग्न लावून द्यायचे ठरवल्याने तिचे शाळेत जाणे थांबवले होते.
दामिनी मार्शल हिंगे यांनी मुलीच्या पालकांशी संवाद साधला. त्यांनी पालकांना समजावले की, ‘शिक्षणानेच आयुष्य बदलते, पिढी उन्नत होते. आज तुम्ही तिचे लग्न लावाल, पण उद्या तीही तुमच्यासारखेच जगेल. पण शिकली, तर तुमचेही नाव उजळवेल.’ त्याचबरोबर त्यांनी पालकांना कायद्याचीही माहिती दिली. अल्पवयीन मुलीचे लग्न लावणे हा गंभीर गुन्हा आहे आणि त्यासाठी अटकही होऊ शकते. हे ऐकल्यावर ती लहान मुलगी भावनावश होऊन रडायला लागली. ती म्हणाली, ‘‘माझ्या पप्पाला पकडून नेऊ नका...’ त्यावेळी मुलगी आपला एवढा विचार करते आणि आपण तिचे भविष्य उद्‍ध्वस्त करीत आहोत, याची जाणीव वडिलांना झाली. वडिलांचे डोळे पाणावले. ‘आम्ही कितीही कष्ट करू, पण मुलींना शिकवू. त्यांचे शिक्षण आणि नोकरी लागल्यावरच लग्न करू,’ असा निर्णय वडिलांनी घेतला. संवेदनशील वरिष्ठ निरीक्षक आणि ‘दामिनी मार्शल’च्या प्रभावी हस्तक्षेपामुळे सातवीत शिकणाऱ्या एका मुलीचे बालविवाहापासून रक्षण झाले. केवळ संवादातून एका गरीब मजूर दांपत्याचे मन पालटून ‘शिक्षणाचा दिवा’ पुन्हा पेटवला गेला.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दामिनी पथके स्थापन केली आहेत. या पथकातील दामिनी मार्शल दररोज परिसरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. ‘गुड टच, बॅड टच’बाबत मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळे विद्यार्थीही तक्रार करण्यास पुढे येत आहेत. एका अल्पवयीन मुलीचे लग्न टाळता आले, ही पोलिसांसाठी समाधानाची बाब आहे.
- महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर

समुपदेशनानंतर ती पुन्हा शाळेत नियमित जात आहे, याचे समाधान आहे. मुलीचे कुटुंबीय दहा बाय दहाच्या खोलीत राहतात. त्यांच्याकडे दसऱ्याच्या सणादिवशी केवळ तीनशे रुपये होते, हे ऐकून मन हेलावले. नुकतीच तिने परीक्षा दिली असून पेपरही चांगले गेले. ती खूप हुशार आहे. तिला भविष्यात पोलिस अधिकारी व्हायचे आहे.
- सोनाली हिंगे, दामिनी मार्शल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com