मतदारयादीची जबाबदारी दोन अधिकाऱ्यांवर
पुणे, ता. ७ ः पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्यासाठी दोन महापालिका उपायुक्तांवर जबाबादारी निश्चित करण्यात आली आहे. प्रभागनिहाय मतदार यादी फोडणे, ती अंतिम करून सही शिक्क्यासह निवडणूक शाखेकडे सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. उपायुक्त रवी पवार आणि निखिल मोरे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर प्रशासनाकडून आता मतदार यादीचे काम हाती घेतले आहे. शहरात ४१ प्रभाग असून, मतदान केंद्रांची संख्या सुमारे ५ हजार असणार आहे. विधानसभा निवडणुकीपेक्षा महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आल्याने कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे विविध जबाबदाऱ्यांचे विक्रेंदीकरण करून ही कामे वेळेत व व्यवस्थित पार पाडली जावीत यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार आयुक्त नवलकिशोर राम यांनी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम उपायुक्त पवार आणि मोरे यांच्याकडे दिले आहे. पवार यांच्याकडे प्रभाग क्रमांक १ ते १२, २५ आणि २७ ते ३५ अशा २२ प्रभागांची जबाबदारी दिली आहे. तर मोरे यांच्याकडे प्रभाग क्रमांक १३ ते २४, २६ आणि ३६ ते ४१ अशा १९ प्रभागाची जबाबदारी दिली आहे.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कक्ष
महापालिका कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘निवडणूक प्रशिक्षण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करणे, मतदान केंद्रांची आखणी, मतदान यंत्र वापरण्याचे हाताळणे, उमेदवारी अर्ज प्रक्रिया, निकाल प्रक्रिया आदीचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रशिक्षण कक्षाचे प्रमुख म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा ‘यशदा’चे सहयोगी प्राध्यापक राजीव नंदकर यांची नियुक्ती केली आहे. प्रशासन अधिकारी संगीता कोकाटे, महापालिकेच्या प्रशिक्षण प्रबोधिनीचे उपअधीक्षक संजय काळे यांची सहाय्यक कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रभागांची विभागणी
शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ४१ प्रभागांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्तांना नोडल ऑफिसर म्हणून काम करून त्यांनी मतदारयादी विभागणीचे काम करवून घ्यावे लागणार आहे. एका क्षेत्रीय कार्यालयाकडे जास्तीत जास्त तीन तर कमीत कमी दोन प्रभागांची जबाबदारी असणार आहे. मतदार यादीचे काम करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाकडून अभियंता वर्ग, आरोग्य निरीक्षक व इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश काढले जातील.
क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक
येरवडा-धानोरी-कळस - १, २, ६
नगररस्ता-वडगाव शेरी - ३, ४, ५
शिवाजीनगर-घोले रस्ता - ७, १२
औंध-बाणेर - ८, ९
कोथरूड-बावधन - १०, ११, ३१
ढोले पाटील रस्ता - १३, १४
हडपसर-मुंढवा - १५, १६, १७
वानवडी-रामटेकडी - १८, १९, ४१
बिबवेवाडी - २०,२१,२६
भवानी पेठ - २२, २३, २४
कसबा-विश्रामबाग - २५, २७, २८
वारजे-कर्वेनगर - २९, ३०, ३२
सिंहगड रस्ता - ३३, ३४, ३५
धनकवडी-सहकारनगर - ३६, ३७, ३८
कोंढवा-येवलेवाडी - ३९, ४०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.